कथा हा साहित्यप्रकार अतिशय तरलपणे हाताळणाऱ्या त्या काळातील नवकथेहून निराळा बाज घेऊन दमा साहित्यविश्वात अवतरले. त्यांच्या चित्रमय शैलीने वाचणारा नुसता गालातल्या गालात स्मित करीत नाही, तर खळखळून हसतो. जणू काही ती घटना आपल्या समोरच घडते आहे, असा सुखद भास व्हावा, अशी त्यांची कथा. वाचनाएवढेच त्यांच्या कथा त्यांच्या मुखातून ऐकणे अधिक बहर आणणारे. उत्तम वक्ता असणे वेगळे आणि कथा रंगवून सांगणे वेगळे. मिरासदारांकडे हे दोन्ही गुण होते. त्यांची कथा ऐकणे म्हणजे शब्दांतून रंगणारा चित्रपट. त्यातील पात्रे, त्यांचे संवाद, घटना, त्यातील फजिती, त्याने येणारे कसनुसेपण हे सारे त्यांच्या कथाकथनात अशा बाजाने येत असे, की श्रोता हसून हसून दमून जाई. मिरासदार, पाटील आणि माडगूळकर या लेखकत्रयीने महाराष्ट्राला त्याची खरीखुरी ओळख करून दिली. शहरी लेखकांच्या कथा वाचणाऱ्या वाचकांनाही मिरासदारांनी अतिशय अलगदपणे आपल्या तंबूत आणून ठेवले. केवळ विनोद एवढय़ाच भांडवलावर ते शक्य नव्हतेच. माणसे वाचत असताना, त्यांच्या भोवतालचा परिसर, त्यांच्या लकबी, त्यांच्यातील पापभीरूपणा, टागरटपणा, इरसालपणा, बेरकीपणा, वाह्य़ातपणा, सौजन्य आणि औद्धत्य या सगळ्या गुणांचा दमा आपल्या कथांमधून सहजपणे परिचय करून देतात. त्यामुळे त्या कथांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.