या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र

कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याने चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर आहे असे समजून त्याला देव्हाऱ्यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. याउलट ‘तो तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली’ तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारुपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसऱ्यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.

डॉ सदानंद मोरे हे पुणे विद्यापीठातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक व भारतीय संस्कृती आणि इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय. तो हाताळतानाच त्यांचा संबंध महाभारताबरोबरच भगवतगीता व कृष्णचरित्र असलेल्या पुराणांशी आला.त्यातही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा कृष्ण आढळला व त्यांचाही कृष्णचरित्राचा एक वेगळा शोध सुरु झाला आणि तो होता विचारवंत व तत्वज्ञानी कृष्णाचा. याचीच परिणती एका शोधनिबंधात झाली तो म्हणजे Krishna : The Man and His Mission. हाच शोधनिबंध श्रीमती पूर्णिमा लिखिते यांनी “या सम हा” या नावाने मराठीत पुस्तकरूपाने आणला आहे.

या शोधनिबंधाचे स्वरूप अर्थातच कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून न पाहता इहलोकातील मानव म्हणून पाहिले तर कसे दिसेल हे आहे. यात कृष्णचरित्राचे तत्वज्ञान ठासून भरले आहे. शोधनिबंध असल्याने सुरवातीचे प्रकरण नेमकी समस्या (अथवा शोधनिबंधकारासमोरील प्रश्न) व पद्धत (प्रश्नाचं अथवा समस्येचं निराकरण करण्याची) याचा उहापोह आहे. यासाठी त्यांनी पाश्चात्य तसेच भारतीय पूर्वसुरींच्या अभ्यासाचा आढावा घेतला असून देवावताराचे प्रारूप आपल्यासाठी केवळ निरुपयोगीच नाही तर कसे धोकादायक ठरू शकेल ते दाखविले आहे. यानंतर यात बंगालचा चैतन्य संप्रदाय व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या कृष्णभक्त संप्रदायांची तुलना आहे. या संप्रदायांची साहित्यनिर्मिती व त्यांचा परंपरांवरील ठसा यांचा आढावाही आहे.

“कृष्णाच्या कर्तृत्वाची रूपरेषा” या प्रकरणामध्ये कृष्ण चरित्रातील ठळक गोष्टी येतात व त्यांचे विश्लेषण देखील येते. कृष्णाचा कंस वध, त्याचे नातेसंबंध, विवाहसंबंध, महत्त्वाच्या घटना व त्यात त्याची भूमिका, एकलव्या बद्दलची माहिती, अक्रूर स्वभावाचे बारकावे दर्शविणारी स्यमंतक मण्याची कथा, वासुदेवत्वाचा प्रश्न, इत्यादी अनेक मुद्द्यांना डॉक्टर मोरे स्पर्श करतात व त्यामागची प्रेरणा, तत्वज्ञान, विचारसरणी समजावून सांगतात.

यात आपल्याला गणराज्य व राजसत्ता यातील संघर्षाची बीजे सापडतात व यादव संघात माजलेली दुफळी कळते. त्यातून कृष्ण या लोकनेत्याचा उदय कसा झाला असावा हे आपल्या लक्षात येते. हे राजकीय प्रश्न सोडवताना कृष्णाची प्रगल्भता बहरत जाते व त्याचे सामाजिक स्थान, नेतृत्वगुण, हे देखील उभारून वर येतात. कृष्णाचे विवाह, त्यामागचे हेतू , आपल्याला स्पष्ट होत जातात. कृष्णशिष्टाईच्या वेळचे योगेश्वर दर्शन म्हणजे त्याच्या मुत्सद्देगिरीचा परमोच्च बिंदू. ज्याने युद्धाचा सर्व दोष कौरवांच्या पारड्यात टाकण्यात व सहानुभूतीचे जनमत पांडवांच्या बाजूने वळविण्यात कृष्ण कमालीचा यशस्वी ठरला.

या पुस्तकाचे स्वरूप कृष्णाचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचे असल्यामुळे दैव व पुरुषकार, कर्मांचे समर्थन – गरज आणि आवश्यकता, अर्जुनाचा प्रश्न, धर्म रहस्य, नीती-प्राधान्य वाद, इत्यादी विविध प्रकरणातून कृष्णाच्या तात्विक बैठकीचे पैलू डॉक्टर मोरे यांनी व्यवस्थित उलगडले आहेत. यातील योग व धर्म यांचे विवेचन तर केवळ अप्रतिम आहे.

वैचारीक साहित्य असल्याने पुस्तक वाचायला व समजून घ्यायला अवजड आहे, सर्वसामान्य वाचकाला वर्गाला ह्यातुन कृष्ण अथवा महाभारत सहज पचनी पडायला कठीण जाते. हे पुस्तक म्हणजे एक शोधनिबंध आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला त्याचे वेगळेपण आणि महत्त्व लक्षात येईल.

द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

1 Comment

  1. Sundar, punha punha wachave ase pustak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *