बालसाहित्य कशासाठी?

‘जादूची चटई’ ते ‘जादूई दिवा’कालीन मराठी बालसाहित्य छापले जाणे जागतिकीकरणाच्या आरंभीच बंद झाले. भा. रा. भागवतांपासून ते बालसाहित्यात आवडीने वाचले जाणारे सारेच लेखक नव्या युगाच्या उंबरठय़ावर रद्दबातल ठरले, ते पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याची असोशी कायम राखल्यामुळे. पण शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम स्वीकारले म्हणून मातृभाषेकडे पूर्ण पाठ फिरवण्याची गरज नाही, हे स्पष्ट करणारे नवे लेखक आणि चित्रकार सध्या देशभरात प्रादेशिक बालसाहित्याची निर्मिती करीत आहेत. इंग्रजी उत्तम राखून आपल्या पाल्याला मातृभाषेचीही गोडी लागण्यासाठी या बालग्रंथ प्रयोगांचे आजच्या काळातील महत्त्व पालकांनी जाणून घेण्याची मात्र गरज आहे. शाळांना लागणाऱ्या उन्हाळी सुट्टय़ांच्या निमित्ताने ताज्या मराठी बालसाहित्याची हालहवाल घेण्याचा हा प्रपंच.

एखादी परकी भाषा शिकणे आणि पूर्ण शिक्षणच परक्या भाषेतून घेणे या दोन वेगवेगळय़ा गोष्टी आहेत. मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे मुलांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असते, असे अनेक तज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. तरीही मराठी पालक आपल्या पाल्याला इंग्रजीतूनच शिकवण्याचा निर्णय घेताना दिसतात. त्यावरून भरपूर वादविवाद आणि उलटसुलट चर्चा झालेली आहे. पण परिणामांची कल्पना असूनही पालक आपला आग्रह सोडत नाहीत. याचा अर्थ त्यांनी विचारपूर्वकच घेतलेला असणार. त्यामुळे या विषयावर नव्याने काही म्हणावे, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आणि बदल घडवणे कुणाच्याच हातात नाही, असे मी स्वत:ला कधीपासूनच समजावले होते. तरीही, ‘इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनी मराठी बालसाहित्य वाचणे गरजेचे का आहे?’ या विषयावर लिहिण्याबद्दल माझ्याकडे विचारणा झाली. मी ‘हो’ म्हटले. आशा चिवट असते.

एक गोष्ट मी सुरुवातीलाच स्पष्ट करते: पालकांनी आपला निर्णय बदलावा असे मी मुळीच सुचवणार नाही आहे. त्याला आता फार उशीर झाला आहे. मी मुलांसाठी लिहिते. फक्त मराठीतच लिहिते. आजही माझी पुस्तके विकली जातात, हेही एक वास्तव आहे. त्या आधाराने एकदोन मुद्दे मांडणार आहे.

मला अधूनमधून काही पालक भेटतात. त्यांची सामाजिक – सांस्कृतिक – आर्थिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. त्यांत काही अन्यभाषकही असतात. माझ्याशी ते पुस्तकांबद्दल बोलतात. या लेखाच्या विषयासंदर्भात त्यांच्या काही प्रतिक्रिया आठवतात. त्यांचा हा सारांश –

‘‘आमची मुलं इंग्लिश शाळेत घातलीयेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही इंग्लिश पुस्तकंच आणत होतो. महाग असतात, पण छान असतात. रंगीत चित्रबित्रं असतात. पण तरीही.. वेगळी असतात. म्हणजे आपली नाही वाटत ती. अलीकडेच तुमची पुस्तकं पाहिली आणि नवलच वाटलं! त्यातली मुलं- माणसं सगळी आमच्यासारखीच दिसणारी, आमच्यासारखंच वागणारी – बोलणारी आणि त्यांची नावंपण आमच्यासारखीच होती. अशी मराठी पुस्तकं असतात हे माहीतच नव्हतं आम्हाला, आता घरी आम्ही सगळे तीच वाचतो. मुलं पण मराठी वाचायला लागलीयेत. थँक्यू बरं का, मॅडम, अशी पुस्तकं लिहिल्याबद्दल.’’

इतकी साधी आणि स्वाभाविक अपेक्षा असते पालकांची. बालसाहित्याने आमच्या आयुष्याबद्दल, नात्यांबद्दल, इथल्या निसर्गाबद्दल बोलावे. ते मुलांच्या नजरेतून पण लहानथोर सर्वानाच वाचावेसे वाटेल असे असावे. रोज दिसणारी नारळाची, आंब्याची, वडा-िपपळाची झाडे त्यात दिसावीत. हत्ती, घोडे, वाघ यांच्यापासून िभतीवर सरपटणाऱ्या पालीपर्यंत सगळय़ा जिवांचा वावर त्यात असावा.

मराठी पुस्तके वाचू लागलेल्या मुलांबद्दल पालक सांगतात.

‘‘मुलगी अबोल होती, पण आता बरंच बोलायला लागली आहे.’’

‘‘मुलांना सारखं पुस्तकातलं सांगायचं असतं. ‘अक्षय दादा असंच उडय़ा मारत जिने चढतो’, किंवा ‘केतकीच्या अंगणात आहे तसं चफ्याचं झाड आपल्या अंगणात आहे. तू तिला फोन करून सांग. आमच्या शाळेत अशी ‘टण’ करणारी घंटा नाहीये. ती टर्र्र्र असं करते. माझं नाव ‘राधा’ का ठेवलं नाही? कट्टी!! असं सतत चालू असतं.’’ 

इंग्रजी पुस्तके छान असतातच. श्रीमंत असतात. यात लाल – गुलाबी वर्णाची सोनेरी केसांची आणि निळय़ा डोळय़ांची मुले आणि माणसे असतात. ‘किती सुंदर आहे नं ही मुलगी? आणि ते बाळ बघ, किती गोड!’ असे मुलांना सारखे सांगितले जाते. एक नेहमी अस्वस्थ करणारा प्रश्न मला पडतो की, अशीच पुस्तके पाहत आणि वाचत वाढणारे मूल आरशासमोर उभे राहून स्वत:कडे पाहते, तेव्हा त्याच्या छोटय़ा डोक्यात कोणते विचार येत असतील?  पुस्तकातल्या कोणत्या गोष्टींशी ते स्वत:ला, स्वत:च्या अनुभवांना ताडून पाहात असेल? आपण पुस्तकातल्या त्या मुलांसारखे गोरे-गुलाबी नाही. आपले आई-बाबा, आजी-आजोबाही तसे नाहीत. म्हणजे आपण कुणीच सुंदर नाही अशीच स्वत:बद्दलची पहिली जाणीव त्याला होत असेल? इथली जमीन त्याच्या पायांखालून सरकण्याची ही सुरुवात असेल?

मला जे म्हणायचे आहे ते, मला वाटते, मी पुरेसे स्पष्ट केले आहे. तर, मूळ मुद्दा हा की इंग्रजी माध्यम स्वीकारले म्हणून मातृभाषेकडे पूर्ण पाठ फिरवण्याची गरज नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत मराठी बालसाहित्याला मरगळ आली होती, हे खरे आहे. पण आज परिस्थिती बदलते आहे. हे क्षेत्र तरुण लेखक- लेखिकांना आणि चित्रकारांना संधी देण्यासाठी तयार होते आहे. नव्या कल्पना, नवे विषय आणि भाषेची वेगवेगळी रूपे घेऊन गोष्टी सांगण्याच्या आणि माहिती देण्याच्या नव्या पद्धतींचे प्रयोग होताना दिसायला लागले आहेत. पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांची दखल अवश्य घेतली पाहिजे. काही मंडळी अधूनमधून ‘मराठी लवकरच मरणार!’ अशी दवंडी पिटत असतात. काही जण ‘बालसाहित्य ना? त्यात का ऽऽही होत नाहीये आणि होणारही नाहीये’ असा जुनाच आशीर्वाद देत राहतात. आपण ते फार मनावर घेऊ नये. डोळे उघडे ठेवून दर्जेदार बालसाहित्याचा शोध घेत राहावे. एक मिळाले की त्यातून दुसऱ्याकडे नेणारी वाटही सापडतेच. डोळे जितके घट्ट मिटून घ्याल तितका मनातला निराशेचा, नकारात्कतेचा अंधार गडद होत जाईल.

आणि मुख्य म्हणजे मराठीचा अभिमान आता पुरे झाला. झाडून कामाला लागण्याची हीच वेळ आहे. मुलांना मराठीतून गोष्टी सांगितल्या पाहिजेत, वाचून दाखवल्या पाहिजेत. मुलांच्या मनातल्या गोष्टी मराठीतून सांगण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मराठीला आणि फक्त मराठीलाच नव्हे, तर आपल्या पाल्यांच्या उत्कर्षांसाठी जिचा आधार आपण घेतला आहे त्या इंग्रजीलाही – आपल्या प्रेमाची, जिव्हाळय़ाची, आदराची प्रतीक्षा आणि गरज आहे. हे लक्षात घेतले तर मुलांच्या मनात दोन्ही भाषा बरोबरीच्या नात्याने नांदत राहतील.

नवं काय होतंय?

गेली सहा दशके ज्योत्स्ना प्रकाशन मराठी बालसाहित्य प्रकाशनाच्या क्षेत्रात अग्रभागी राहिली आहे. या प्रकाशनातर्फे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांत नवी पुस्तके आणली आहेत. त्यांच्या अद्ययावत संकेतस्थळावर या पुस्तकांचा तपशील उपलब्ध आहे. भारतीय भाषांमध्ये चित्रपुस्तक (पिक्चरबुक ) ही कल्पना अलीकडेच रुळली. पायाभूत साक्षरतेच्या  (‘फाउंडेशनल लिटरसी’) तत्त्वांचा मेळ  घालून ‘प्रथम बुक्स’ने मराठी-इंग्रजीसह कित्येक भाषांतील पुस्तके तयार केली आहेत. ती ‘स्टोरीविव्हर’वर डिजिटल वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध असून त्याच्या छापील प्रती विक्रीसाठी आहेत. ‘दवात ए दक्कन’ ही फलटणस्थित बालसाहित्य प्रकाशन संस्था असून त्यांच्या मार्फत निर्माण होणारी सर्व पुस्तके ही पालक आणि मुले यांच्यात वाचनातून नातेसंबंध समृद्ध व्हावा आणि संवाद वाढीस लागावा या उद्देशाने केली आहेत. पालक वाचनात सहभागी असतील हे गृहीत धरूनच निर्माण केलेली पुस्तके असल्याने शब्दांच्या काठिण्यपातळीचा मुद्दा महत्त्वाचा न करता गोष्ट, माहिती आणि मनोरंजन हे मुद्दे प्रामुख्याने यात घेतलेले आहेत.

चित्रपुस्तकांचा फायदा..

या पुस्तकांची आधीच्या पिढीच्या बालसाहित्याशी तुलना करता येणार नाही. सर्वच पुस्तके चित्रसमृद्ध आहेत. पूर्वी कमीत कमी जागेत कृष्ण-धवल चित्रांना कोंबण्याचा अट्टहास असे. चित्र ही शब्दांसह मुलांच्या भावनिक जडण-घडणीत मदत करतात. याचा विचार करून त्यांना पुस्तकांत स्थान देण्यात आले आहे.  केवळ सजावट म्हणून चित्रे नसतात तर ती गोष्ट समजायला मदत करतात, गोष्टीला पुढे नेतात, मजकुरात नसलेल्या अनेक गमती, बारकावे आणि तपशील चित्रात सापडतात. या चित्राचेही ‘वाचन’ मजकुराच्या बरोबरीने करायला लागते. शब्दांमधून तर मुलांची भाषा विकसित होतेच, पण ती चित्रांमधूनही  होते. आपल्याला चित्रात सापडलेल्या गोष्टी सांगताना, त्याचे वर्णन करतानाही मुलाची भाषा घडत जाते. दृश्यकलांची जाणीव हा आणखी एक फायदा होतो.

भाषिक जडण-घडणीसाठी..

आपल्या मातीतल्या गोष्टी असलेले बालसाहित्य प्रत्येक मुलाच्या हाती पडावे आणि ती त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग असावीत, हा या नव्या पुस्तकांच्या लेखक-चित्रकारांचा उद्देश आहे. इंग्रजी शाळेतील मुलांची मराठी अधिकाधिक लख्ख करण्यासाठी आणि मराठी शाळांतील मुलांचे इंग्रजीभय कमी करण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात द्वैभाषिक किंवा अनेक भाषिक विचारवंतांची घडण शब्दांशी आणि भाषेशी मैत्री करण्यातून झाली. मुलांचा बुद्धय़ांक वाढविण्यात चित्रपुस्तके अतिशय महत्त्वाची ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

बालमासिकांच्या जगात..

किशोर 

मुलांमध्ये पूरक वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावं, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून बालभारती १९७१ पासून ‘किशोर’ मासिक प्रकाशित करते. मुलांच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवं असतं. काही अद्भुतरम्य विलक्षण असं पाहावं, ऐकावं याकडे त्यांचं मन सारखं झेपावतं. या सर्वागानं, सर्वाशानं फुलण्याच्या काळात पूरक साहित्याच्या माध्यमातून मदत करण्याची ‘किशोर’ची भूमिका आहे. 

कुल्फी

समकालीन, बहुसांस्कृतिक, बहुआयामी साहित्य कुमार/ किशोर वयाच्या मुलांना वाचायला मिळावं

म्हणून ‘कुल्फी’ हे नियतकालिक दिवाळीत सुरू झालं. आता पाडव्याला याचा दुसरा अंक प्रसिद्ध झाला आहे. ‘कुल्फी’त आजच्या मुलांना वाचावंसं वाटेल असं साहित्य आहे. विविध बोली असणारं, वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व देणारं दर्जेदार साहित्य ही याची खासियत.  

चिकूपिकू

‘चिकूपिकू’ हे १ ते ८ वयोगटातल्या मुलांसाठीचं पहिलंच मराठी मासिक आहे! पहिल्या आठ वर्षांत मेंदूविकास झपाटय़ाने होत असतो. या काळात जे अनुभव मिळतात त्यातून मूल सहज शिकत असतं आणि व्यक्ती म्हणून घडतही असतं. विविधांगी बुद्धिमत्ता (Multiple intelligences) सिद्धांतावर आधारित, मेंदूच्या वाढीसाठी निरनिराळे अनुभव गोष्टींमधून मुलांना मिळावे यासाठी हे मासिक काम करत आहे. 

ठकठक..

नव्वदीच्या दशकात सर्वाधिक खपाचे बालमासिक ही ठकठकची ओळख होती. मधल्या काही वर्षांंत ते बंद पडले होते. पण या वर्षीपासून ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत आणि मोठय़ा आकारात सुरू झाले आहे.  या मासिकाच्या चित्रकथांमधून दिपू द ग्रेट, बन्या, टिपू यांच्या प्रचंड लोकप्रिय कथा आत्ताच्या काळाला आणि पिढीला अनुसरून पुन्हा अवतरल्या आहेत.

वयम्

‘वयम्’ मासिक कल्पक, चौकस कुमार-किशोरांसाठी आहे. विविध प्रकारच्या गोष्टी (कल्पनारम्य कथा, संवेदनशील गोष्टी, रहस्यकथा, विज्ञानकथा, इ.) कविता, खेळ, कला यांच्या बरोबरीनं वयम् मासिकात अनुभव-लेख असतात. वास्तव साहित्यातून मुलांना आपल्या भवतालाचं आकलन अधिक होतं. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर त्या त्या विषयांतील तज्ज्ञ जेव्हा लिहितात, तेव्हा रोचक माहिती देता देता मुलांचा दृष्टिकोन घडेल, औत्सुक्य चाळवेल असा प्रयत्न केला जातो. 

ऋग्वेद

शिक्षक बालक आणि पालक याचं व्यासपीठ म्हणून गेली २४ वर्षे ‘ऋग्वेद’ मासिक प्रकाशित होत आहे. प्रामुख्यानं हे मासिक किशोर व कुमार वाचकांसाठी चालवलं जातं. ग्रामीण भाग, अपुऱ्या सोयी व अधुरं अर्थकारण असूनसुद्धा हे मासिक सातत्यानं प्रकाशित करण्यात आलं. या मासिकामार्फत प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

– माधुरी पुरंदरे

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *