• -100%

    श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा

    0

    निवेदन 

    पंढरपूरचा श्री विठ्ठल हा जसा आपल्या ‘विठोबा’ या मराठमोळ्या नावाने महाराष्ट्रीय समाजाच्या हृदयामध्ये अत्यंत आदरपूर्वक प्रस्थापित झाला आहे, त्याप्रमाणेच त्याचा परमभक्त संत तुकाराम यालाही महाराष्ट्राच्या मनामध्ये अद्वितीय आणि अलौकिक स्वरूपाचे स्थान मिळालेले आहे. मराठी भक्तजन श्री ज्ञानदेवांच्याबरोबरच संत तुकारामांनाही परमश्रध्येय मानतात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा उत्कट भावाने गजर करतात. श्री विठ्ठल, श्री नामदेव, संत तुकाराम ही महाराष्ट्राची आराध्य दैवते आहेत. श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिभेने जज्ञी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच उत्कट भक्तीभावाने संत तुकारामांनी आपले अभंग लिहिले. तुकाराम हे महाराष्ट्रातील संत मंडळींचे शिरोभूषण मानले जातात. गेली साडेतीनशे वर्षे तुकारामांची गाथा महाराष्ट्राने हृदयाशी बाळगून आध्यात्मिक वाटचाल केली आहे.  

    जनसामान्यांना प्रिय असलेल्या संत तुकारामांची सकल गाथा प्रसिद्ध करून ती सर्वांना उपलब्ध करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई सरकारने १९५० साली घेतला आणि शासनामध्ये न्यायमूर्ती या उच्च पदावर काम करतानाही अंतरीचे काव्यगुण जोपासणाऱ्या आणि संत वाड्मयाचा प्रगाढ व्यासंग असलेल्या स्व. पुरुषोत्तम मंगेश लाड या विद्वान सनदी अधिकाऱ्याची गाथेच्या संपादनासाठी नियुक्ती केली. लाड हे स्वतः उत्तम कवी होते आणि त्यांचा संत वाड्मय आणि आधुनिक कविता यांचा विशेष अभ्यास होता. तुकारामांची गाथा संपादित करून प्रकाशित करण्याचे महत्‌ कार्य लाडांनी स्वीकारले आणि आपल्या अतिशय विवेचक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह १९५० साली तुकारामांची गाथा शासनातर्फे प्रथम प्रकाशित झाली. तिचे वाचकांनी अभूतपूर्व स्वागत केले. १९५५ साली तुकाराम बीजेला गाथेची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर १९७३ साली तिसरी आवृत्ती शासनातर्फे प्रकाशित झाली आणि आता ती दुर्मीळ झालेली आहे.  

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे श्री एकनाथी भागवत आणि श्री नामदेव गाथा हे दोन बहुमोल ग्रंथ पुन्हा प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे दुर्मीळ झालेली तुकारामांची गाथासुद्धा पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९५० साली प्रथम प्रकाशित झालेल्या गाथेच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सुयोग सध्याच्या मंडळाला लाभलेला आहे. श्री नामदेव, श्री एकनाथ आणि संत तुकाराम यांचे वाड्मय महाराष्ट्राला पुन्हा अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याची सुसंधी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. संत तुकारामांना विनम्र भावाने अभिवादन करून ही गाथा मी महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करीत आहे.  मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% समर्थ

    समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी

    0

    समर्थ चरित्राची रूपरेषा

    आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला संत परंपरेचे फार मोठे वरदान लाभले आहे. विशेष म्हणजे मराठी संतांनी केवळ चमत्कार केले नाहीत तर त्यांनी चिरंतन असे आध्यात्मिक विचारधन पाठीमागे ठेवले.  हजारो वर्षे मराठी माणूस या विचारांच्या प्रकाशात जीवनाची यशस्वी वाटचाल करीत राहील. आद्यतम कवी मुकुंदराजांचा विवेकसिंधू, संत शिरोमणी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे हजारो अभंग, समर्थ रामदासांचा दासबोध, संत एकनाथ महाराजांचे भागवत हे सारे ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राची खरी संपदा आहे. संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई आदी संतांनी देखील या विचारधनात मौलिक भर घातली. महाराष्ट्रातील संतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ भाबडेपणा किंवा अंधश्रद्धा यांना कधीही खत-पाणी घातले नाही. त्यांनी मराठी माणसाचे ज्ञानचक्षू उघडले. त्याची विचारशक्ती जागी केली. या सर्व संतांनी शास्त्रशुद्ध परिभाषेत आध्यात्मिक विचार दिले. प्रस्तुत ग्रंथात आपण समर्थ रामदासांच्या समग्र साहित्याचा परामर्श घेणार आहोत. 

    अनुक्रमणिका

    • निवेदन……
    • समर्थ चरित्राची रूपरेषा…
    • करूणाष्टके : समर्थांचे आत्मचरित्र ….
    • मनाचे श्लोक…..
    • आत्माराम…..
    • तुळजाभवानीची स्तोत्रे
    • हनुमंताची स्तोत्रे…
    • गुरुगीता
    • समर्थांचा पत्रव्यवहार
    • राजधर्म, क्षात्रधर्म अखंड सावधानता…
    • मुसलमानी अष्टक
    • ग्रंथराज दासबोध..
    • समर्थांच्या आरत्या …..
    • भौगोलिक स्थानांची वर्णन ……
    • एकवीस समासी : जुना दासबोध ….
    • काही स्फुट प्रकरणे ….
    • समर्थांची लोकसाहित्य रचना….
    • धन्य ते गायनी कळा …..
    • समर्थांचे अभंग …
    • संदर्भ ग्रंथ…..

    Digital Book 

    Original price was: ₹60.00.Current price is: ₹0.00.
  • -100% साने गुरुजी

    सेनानी साने गुरुजी

    0

    कोकणातला निसर्ग आणि खानदेशची माती व माणसे यांच्यावर गुरुजींनी निरतिशय प्रेम केले.

    अंतरीच्या उमाळ्याने गुरुजींनी लेखणीचा वापर केला त्याच उमाळ्याने त्यांनी आपली वाणीही वापरली. लेखणी आणि वाणी ही त्यांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी लाभलेली अमोघ अशी वरदानेच होती. ‘हा माणूस आपले जीवन, आपली सुखदुःखे, आपल्याच भाषेत, आपल्यापाशी तादात्म्य पावून अपरंपार सहानुभूतीने रंगवतो आहे’ असेच त्यांना भावले.

    याच उमाळ्याने शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरुजी वावरले. ‘गुरुजी’ हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कुणीही सार्थ केलेले नाही. तसे अंमळनेरच्या शाळेत श्रिक्षक म्हणून ते पाच-सहा वर्षेच होते. पण शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधी सोडली नव्हती. समाजशिक्षणाचे कार्य अनेक अंगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.

    साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड हा श्रद्धाशील समर्पणवृत्तीच्या प्रेमळ अशा आर्त भक्ताचाच होता. त्यांनी मानवावर आणि मानवेतर सुष्टीवरही अपार प्रेम केले. प्रेमधर्माचे ते यात्रिकच होते. ‘खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे’ ह्या तर्‍हेच्या प्रेमधर्माची पताका त्यांनी आयुष्यभर फडकवत ठेवली. गुरुजींनी आपल्या वागणुकीतून, शिकवणुकीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाच्या दिडीचे ते दिडीकरच होते.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% हुतात्मा दामोदर हरि चाफेकर

    हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त

    0

    रॅन्डचा खून केल्यामुळे दामोदर हरि चापेकरांना फाशीची शिक्षा झाली असता ऑक्टोबर, १८९७ मध्ये येरवडा कारागृहात त्यांनी आपली सर्व हकिकत मोडीत लिहून ठेविली. श्री. वि. गो. खोबरेकर यांनी सदर मोडी हस्तलिखिताचे बालबोधीकरण व संपादन करून ते प्रकाशनासाठी मंडळाच्या स्वाधीन केले,  त्याकरीता मंडळ आभारी आहे. येरवडा कारागृहात असलेले हे मोडी बाड पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकास एका क्रांतिकारकाच्या मनाची तळमळ, त्यांनी आपल्या साध्याकरिता केलेली साधना याचा परिचय होईल आणि क्रातिकारकांवरील वाड़्मयात मोलाची भर पडली. 

    लक्ष्मणशास्त्री जोशी 

    २९ नोव्हेंबर, १९७४. अध्यक्ष.

    महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, मुंबई ३२.

    कार्तिक शुक्ल १५, १८९६

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम

    हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम (काही आठवणी)

    0

    प्रस्तावना 

    हैदराबादचा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे पान. निझाम आणि इत्तिहाद्‌उलू मुस्लिमीन यांच्या रझाकारी शोषणापासून आणि अत्याचारापासून ज्यांनी हैदराबादला मुक्त करण्याकरिता अटीतटीचे प्रयत्न केले त्या स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, काजीनाथराव वैद्य, केशवराव कोरटकर, के. व्ही. नरसिंहराव, अच्युतभाई देशपांडे, रघुनाथराव रांजणीकर, सीताराम पप्पू, विजेंद्र कावरा या मंडळींच्यावरोबर ‘हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम’या ग्रथांचे लेखक शंकरभाई पटेल यांनी काम केले आहे. जेव्हा एखादा प्रसिद्ध इतिहास लिहिला जातो तेव्हा त्यात काही खरे, काही खोटे येऊ शकते. अशा वेळी भिन्न मताच्या लोकांनी मांडलेला इतिहास जपून ठेवणेही आवश्यक असते. हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामावर वसंत पोतदार यांनीही ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात अनेक चुका आहेत असे शंकरभाई पटेल यांचे म्हणणे. हीच गोष्ट अच्युत खोडवे यांना पण जाणवली. माझे मित्र अनंतराव भालेराव यांनी याच लढ्यावर “पेटलेले दिवस’ नावाचे पुस्तक लिहिले. उमरी बँक लुटण्याची घटना आणि नांदेडमधील चाउस इत्यादींच्या संबंधातल्या असलेल्या घटनांचा त्यांनी उल्लेख केला. आमचे दुसरे मित्र रघुनाथराव रांजणीकर यांना अनंतराव यांच्या कथनात काही त्रुटी जाणवल्या. वस्तुस्थिती अशी असते की, एखाद्या प्रदेशाचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा निरनिराळे इतिहासकार आणि त्या घटनेचे साक्षीदार यांनासुद्धा त्या इतिहासाचे सगळेच पापुद्रे माहीत नसतात आणि त्यांना त्यामुळे या घटनांत वेगवेगळा अर्थ जाणवतो. अशा वेळी ज्यांना जे सांगावयाचे आहे त्यांचे एकदा सांगून होणे महत्त्वाचे ठरते. कारण इतिहास म्हणून जे सांगितले जाते ते इतिहासाचे साधनमात्र असते. त्यामुळे जे जे हैदराबादवर इतिहास लिहिले गेले ते केवळ स्वकपोलकल्पित असले तरी ते प्रसिद्ध केले पाहिजेत असे मला वाटते.  

    यादृष्टीने अनंतराव भालेराव, वसंत पोतदार यांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेतच. तसेच शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथालाही ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. उद्या श्री. सीताराम पप्पू किंवा दामोदर पांगरेकर किंवा के. व्ही. नरसिंहराव आदी लोक हैदराबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहितील तेव्हा त्यालाही एक महत्त्व राहणार आहे. शंकरभाई पटेल हे एक मोठे कार्यकर्ते. त्यांचा अनुभव फार मोलाचा. शंकरभाई यांचे वय आता बरेच झाले आहे. त्यांनी यावेळी हा ग्रंथ लिहून पुढील पिढीवर मोठे उपकार करून ठेवले आहेत. आपला अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हेही एक मोठे समाजकार्यच असते. ते शंकरभाई पटेल यांनी पुरे केले आहे. आपले लेखन हे आपल्या अपत्यासारखे असते. आपले मूल वेळीच घरी परतले नाही तर आईच्या मनात हुरहूर लागते. या पुस्तकास विलंब लागत आहे असे पाहून शंकरभाईंनाही हुरहूर लागणे स्वाभाविक आहे. पण लेखनानंतरच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असतो. शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथ-प्रकाशनास विलंब लागला, त्यास साहित्य आणि संस्कृती मंडळाचा नाईलाज होता. हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात मंडळाकडून कोणतीही कुचराई झाली नाही असे मी शंकरभाई पटेल यांना आश्वासन देतो. हा ग्रंथ प्रसिद्ध करताना मंडळास आनंद होत आहे हे सांगणे नकोच.

    सुरेन्द्र बारलिंगे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

    २ ऑक्टोबर १९८६

    Digital Book

    Original price was: ₹125.00.Current price is: ₹0.00.