Description
निवेदन
“नामदेव गाथा” हे महाराष्ट्राचे उच्च कोटीचे सांस्कृतिक धन आहे. श्री नामदेव महाराजांनी भागवत धर्माची ध्वजा महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतातही फडकत ठेवली व मराठी संतांचा भक्तिमार्ग, अध्यात्म आणि ईश्वरनिष्ठा यांचा प्रत्यय महाराष्ट्रावाहेरील समाजाला करून दिला. “ नामदेव गाथा” ही रसाळ व प्रासादिक रचना श्रीनामदेवांच्या भक्तवत्सल वाणीतून प्रगट झाली व गेल्या अनेक पिढया महाराष्ट्राने ती शिरोधार्य मानली. श्रीनामदेव महाराजांचे विठ्ठल हे आराध्यदैवत व श्रीज्ञानेश्वर माउली हे जणू परम दैवत ! नामदेव महाराजांनी त्यांची परोपरीनी आपल्या गाथेमध्ये आळवणूक केलेली आहे. अशी ही नामदेव विरचित गाथा महाराष्ट्राला नव्याने उपलब्ध करून देण्याचे महत्कार्य महाराष्ट्र शासनाने अंगीकारले व गाथेची आवृत्ती अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केली. त्यानंतर आता त्या गाथेचे पुनर्मुद्रण महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे करण्यात येत आहे. हेतू हा की, श्रीनामदेवांची ही अनुपम रचना पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुलभपणे उपलब्ध व्हावी.
श्री. किसनमहाराज साखरे हे भागवत धर्माचे निष्ठावंत उपासक आणि श्रीज्ञानेश्वरी, श्रीनामदेव गाथा यांवर अधिकारी वृत्तीने भाष्य करणारे श्रेष्ठ भक्त. श्रीनामदेव गाथेच्या या आवृत्तीला त्यांनी प्रस्ताचनापर मजकूर लिहावा, अशी आम्ही त्यांना प्रेमाची विनंती केली. श्री. किसनमहाराज साखरे यांनी ती आपल्या भक्तिमार्गाला अनुसरून तत्परतेने स्वीकारली आणि सुबोध, निरूपणात्मक प्रस्तावना लिहून दिली. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच होतील. श्रीनामदेव गाथेची ही नवी आवृत्ती महाराष्ट्रातील घराघरातून आदरपूर्वक संग्रहित केली जाईल व तिचें वाचन, मनन, चिंतन महाराष्ट्राला भक्तिमार्गाचा पुन:प्रत्यय देईल, असा मला विश्र्वास वाटतो.
या नामदेव गाथेची सुसंगत अनुक्रमणिका तयार करण्याचे काम महत्त्वाचे होते. मराठीतील ज्येष्ठ कवी प्रा. शंकर वैद्य (मंडळाचे तत्कालीन सदस्य) यांनी हे काम परिश्रमपूर्वक व तत्परतेने पार पाडले. याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे.
मधु मंगेश कर्णिक,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
दिनांक : २३ एप्रिल २००८. महाराष्ट्र राज्य साहित्य
उपदेश
ऐका कलियुगाचा धर्म । पुत्र सांगे पितयास काम ।
ब्राह्मण त्यजिती ब्रह्मकर्म । ऐसें वर्तमान मांडले ॥ १॥
माया बहिणी दवडिती । स्त्री आपुली आणविती ।
ऐका ऐका नवल गती । अगा श्रीपति परियेसी ॥२॥
भार्या न करिती पतिची सेवा । नाहीं कवणा धर्माचा हेवा ।
वतंतसे पापाचा ठेवा । अगा केशवा परियेसी ॥३॥
अरे वैराग्याचा घराचारू । आणि संन्यासा मोह थोरू ।
संता बहुत अहंकारू । रुसणें न लगे कोणासी ॥४॥
जाला कलिचा प्रवेशु । 'तुम्हां नामाचा विश्वासु ।
हृदयीं हृषिकेशु । विष्णुदास नामा म्हणे ॥ ५॥
Reviews
There are no reviews yet.