Description
निवेदन
महाराष्ट्राच्या संत महामंडळामध्ये श्री समर्थ रामदासस्वामींचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. अध्यात्मावरोवरच त्यांना सामान्य माणसांच्या जीवनाचा, प्रपंचाचा आणि जगण्यातील प्रयोजनाचा साकल्याने विचार केला. त्या विचारांचा परिपोष त्यांनी आपल्या वाणीच्या व लेखणीच्या द्वारे केला. त्यांचा सर्वत्र संचार असे. त्यामुळे सर्वसामान्य जनांच्या सुखदुःखाची त्यांना जाणीव होती. म्हणून बृहन्महाराष्ट्रामध्ये श्री समर्थांची भक्ती करणारे अभिजन आणि बहुजन सारख्याच प्रमाणात आढळतात. श्री समर्थांचे साहित्य विपुल आहे. त्या साहित्यामध्ये राजकारण, समाजकारण, संगीत, गायन वादन, नृत्य सारख्या ललितकला, शिवाय राज्यशास्त्र, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, आरोग्य आदि अनेक विषयांचा समावेश आपणांस आढळून येतो. श्री समर्थांची प्रज्ञा आणि प्रतिभा अलौकिक होती. त्यांच्या चरित्रातील वैशिष्ट्यांचा विचार आजवर विविध लेखकांनी आपापल्या परीने केलेला आहे. परंतु श्री समर्थांची साहित्य सृष्टी हे एक मराठी वाड़्मयातील अनुपम सौंदर्याचे स्थळ आहे. त्याचा स्वतंत्रपणे विचार व्हावा व त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन वाचकांना घडावे या हेतूने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने श्री रामदास स्वामींच्या चतुर्थ जन्मझताव्दीच्या निमित्ताने एक विशेष ग्रंथ प्रकाशित करावयाचे योजिले व तो ग्रंथ सिद्ध करण्याचे कार्य समर्थ भक्त व श्री रामदासांच्या चरित्राचे व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक श्री. सुनिल चिचोलकर यांच्याकडे सोपविले. त्यांनी अतिशय परिश्रमाने समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी हा प्रस्तुत ग्रंथ मंडळाला अल्पावधीत लिहून दिला.
आजवर श्री समर्थ रामदासांच्या झाला त्यामध्ये श्री. सुनिल चिंचोलकरांच्या या पुस्तकाने वैशिष्ट्यपूर्ण भर पडेल यात शंका नाही. श्री समर्थ रामदासांच्या चतुर्थ जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या साहित्यिक प्रतिभेवरील हा ग्रंथ वाचकांना आवडेल अशी आशा आहे.
मधु मंगेश कर्णिक, मुंबई
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
ग्रंथराज दासबोध
समर्थांची वाड्मयसंपदा अफाट आहे. पण त्यामध्ये श्रीमद् दासबोधाचे स्थान सर्वांत महत्त्वाचे आहे. समर्थ संप्रदायाचा तो प्रधान ग्रंथ आहे. खुद्द समर्थांनी देह ठेवताना शोक करणार्या आपल्या शिष्यांना सांगितले-
माझी काया आणि वाणी। गेली म्हणाल अंतःकरणी।
परी मी आहे जगजीवनी। निरंतर॥
आत्माराम दासबोध। माझे स्वरूप स्वतः सिद्ध।
असता न करावा खेद| भक्तजनी॥
नका करू खटपट! पहा माझा ग्रंथ नीट।
जेणे सायुज्यतेची वाट। गवसले की॥
समर्थ रामदासांना जर जाणून घ्यायचे असेल तर त्यांचा दासबोध समजावून घ्यावा लागेल. संतांच्या जीवनातील चमत्कार गौण असतात. त्यांचा उपदेश प्रधान असतो. त्याची खरी शिकवण त्यांच्या ग्रंथात पाहायला मिळते. समर्थ संप्रदायाची सारी शिकवण श्रीमद् दासबोधात पाहायला मिळते.
समर्थांनी दासबोध लेखन शिवथरघळीत केले याबद्दल दुमत नाही. त्यासंबंधीचे दिवाकर गोसावींनी १६५४ साली लिहिलेले पत्र उपलब्ध हे. सन १६५२ ते सन १६६० ही आठ वर्षे समर्थ शिवथरघळीत राहिले होते. त्याकाळात त्यांनी दासबोध या ग्रंथाचे लेखन केले. संपूर्ण दासबोधाची प्रत १६६० साली तयार झाली की समर्थांच्या देहत्यागापर्यंत त्याचे लेखन चालूच होते, याबद्दल विविध विचारप्रवाह चालूच आहेत. समर्थांनी सांगितलेली आणि कल्यामस्वामींनी लिहिलेली श्रीमद् दासबोधाची मूळ प्रत आजही डोमगाव येथे उपलब्ध आहे. पण या प्रतीवर शक लिहिलेला नसल्यामुळे ही प्रत नेमकी केव्हा तयार झाली ते सांगणे कठीण आहे. एवढे नक्की की दासबोध लेखन घडले तेव्हा समर्थ संप्रदायाचा फार मोठा विस्तार झालेला होता. समर्थांची शिष्यसंख्या बऱ्यापैकी वाढली होती. वेगवेगळे शिष्य समर्थांना व्यावहारिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय जीवनातील नाना शंका विचारीत होते. ह सारे प्रश्न संकलित करावेत आणि त्यांची उत्तरे देऊन त्याचाच एक ग्रंथ तयार करावा, म्हणजे शिष्यांची कायमची सोय होईल असे समर्थांच्या मनात आले. त्यातून हा ग्रंथ आकाराला आला. दासबोधाच्या कल्याणस्वामींच्या मूळ प्रतीच्या नकला केलेल्या अनेक प्रती आजही उपलब्ध आहेत. कल्याण स्वामींचे धाकटे बंधू दत्तात्रय गोसावी यांचा साताऱ्याजवळ शिरगावला मठ होता. शिरगाव मठात दत्तात्रेयस्वामींच्या हस्ताक्षरात लिहिलेला दासबोध उपलब्ध आहे. याखेरीज साताऱ्याजवळीलच उंब्रज मठातील केशवस्वामींनी लिहून काढलेली दासबोधाची प्रत धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध आहे. केशवस्वामींनी दासबोधाच्या अठरा नकला तयार केल्या असे सांगितले जाते.
Reviews
There are no reviews yet.