Description
निवेदन
१८१८ साली पेशवाईचा अस्त होऊन महाराष्ट्रात इंग्रजी राजवट प्रस्थापित झाली. गुलामगिरीची चीड असलेल्या नागपुरच्या अप्पासाहेब भोसल्यांनी अयशस्वी प्रतिकार केला आणि दोन वर्षे त्यांचा पिच्छा पुरवणार्या इंग्रजांच्या फौजेच्या हाती तुरी देऊन ते निसटले. खानदेशातील भिल्लांनी ही तेरा वर्षे इंग्रजांशी झुंज दिली. बीडचे धर्माजी प्रतापराव, नांदेड जिल्ह्यातील हंसाजी नाईक हटकर, कित्तुरची रणरागिणी चन्नस्मा, कित्तुरचे रायप्पा या शुर स्त्रीपुरषांनीही इंग्रजांविरुद्ध निकराचा लढा दिला. उमाजी नाईक, सावंतवाडीचे आत्मा चौकेकर, राम सावंत, फोंडसावंत कोल्हापूरचे गडकरी तसेच चिमासाहेब भोसले यांनीही इंग्रजांना निमुटपणे शरण जाण्याचे नाकारले आणि पराक्रमाची शर्थ केली.
सातारकर छत्रपतींचे निष्ठावंत सेवक रंगो बापुजी यांनी छत्रपतींचे वकील म्हणून १५ वर्षे विलायतेत वास्तव्य केले. सनदशीर उपाय निष्फळ ठरलेले पाहून रंगो बापूजी हताश झाले नाहीत. १८५७ च्या उठावात रंगो बापुजी गुप्ते आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या लढ्यास अपयश आले. काहींना ज्ञातवास किंवा कारावास पत्कारावा लागला तर काहींना फासावर चढवण्यात आले. १८५७ साली मुंबईतही उठावाचे पडसाद उमटले तसेच खानदेशातील काजीसिंग या भिल्ल नेत्यानेही सशस्त्र लढा दिला. नागपूर, औरंगाबाद येथेही इंग्रजांना प्रतिकारास तोंड द्यावे लागले. नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांना इंग्रजांनी फाशी दिले तर जमखंडीचे संस्थानाधिपती रामचंद्रपंत पटवर्धन यांना नजरकैदेत पडावे लागले.
१८५७ च्या अयशस्वी उठावानंतर महाराष्ट्रात दोन दशके सर्वत्र सामसुम झाल्यासारखे वटले. पण दुष्काळ आणि साथीचे रोग यांनी थेमान घातल्यामुळे वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शुर रामोशी सहकारी यांनी १८७९ मध्ये सशस्र उठाव केला. वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. त्यांना १८८० च्या सुरूवातीस एडन येथे दीर्घमृदतीची सजा भोगण्यासाठी पाठण्यात आले. तेथेच हा विरपुरुष १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यूच्या स्वाधीन झाला.
डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात १८२८ ते १८८४ या काळातील महाराष्ट्रातल्या स्वातंत्रयालढ्यांची कहाणी सांगितलेली आहे. ती प्रेरणादायी ठरेल असे वाटते.
डॉ. य. दि. फडके, अध्यक्ष, महाराष्ट्रात राज्य साहित्य संस्कृती मंडळ
२३ मार्च १९९५
१८५७ चे मुंबईतील पडसाद
१८५७ च्या उठावाच्या वार्ता मुंबईमध्ये धडाक्याने धडकत होत्या. मीरतची कत्तल, दिल्लीचा नाकेबंदी आणि क्रांतीसैनिकांनी दिल्लीचा घेतलेला ताबा या सर्व प्रकारामुळे मुबंईतील गोर्या लोकांची धाबा दणाणली आणि मुंबईत असाच प्रकार झाला तर आपल्या हितसंबंधांना बाध येईल, आपला व्यापार कोसळून पडेल, अश्या भीतीने मुंबईच्या जीवनांत अग्रेसर असलेल्या आणि आपल्या लांगूलचालनामुळे इंग्रजांच्या स्तुतीस पात्र ठरलेल्या मुंबईकरांनी भराभर सभा घेतल्या. त्या सभांतून शूर सैनिकांची निदा केली, इंग्रजांचे गोडवे गायिले आणि आपण इंग्रजी राज्यामध्ये अत्यंत सुखी आहोत आणि इमानी नागरिक म्हणून राहू इच्छितो अशा प्रकारचे विनंतीअर्ज सह्यांनिश्ञी त्यावेळचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांजकडे पाठविले.
सरकारशी असलेले हितसंबंध गोत्यात येतील म्हणून या लोकांनी तसे स्पष्ट लिहून सरकारला आम्ही वाटेल त्या प्रकारचे साहाय्य करण्यास तयार आहोत अश्याप्रकारची ग्वाही देणारा फतवा तयार केला व तो गव्हर्नरकडे पाठविला. त्या फंतव्यावर सही करणारे सर्व जातीचे लोक होते. हिंदु होते, तसेच पारशी, मुसलमान, यहुदी व ख्रिश्चनही होते. यांत प्रामुख्याने डॉ. भाऊ दाजी, आबाजी बापूजी, नारायण दाजी, नवरोजी फ्रामजी, कावसजी जहांगिर, कवसजी जमक्षेटजी, काझी महंमद युसूफ अशा एकंदर सुमारे ५०० नागरिकांच्या सह्या होत्या.
Reviews
There are no reviews yet.