Description
तंट्याच्या ऋणातून मुक्त
तंट्या भिल्ल हा गेल्या शतकातील एक आदिवासी नायक. तो साधा-भोळा होता. त्याची वडिलोपार्जित जमीन कर्जापोटी पाटलाने बळकावली. कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले. जेलमध्ये पाठविले. शिक्षा भोगून आलेला तंट्या मोलमजुरी करू लागला. पुन्हा गावकऱ्यांनी पाटलाच्या मुलीच्या प्रेमसंबंधाचा आरोप ठेवून हुसकावून लावलं. दुसऱ्या वेळी पुन्हा खोटा आरोप ठेवून जेलमध्ये डांबले.
माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱया तंट्याला जमीन हडप करणारे पाटील- मालगुजार, त्यांना साथ देणारे सावकार, पोलिस अन् सर्वच शासन यंत्रणेने जगणे असह्य केले. अन्यायाने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला. आपल्या व्यवस्थेशी आणि बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी लढा सुरू केला.
तंट्या मालगुजार-सावकारांना लुटू लागला. पोलिस चौक्यांवर हल्ला करू लागला. सत्ताधाऱ्यांना डाकू वाटणारा तंट्या डाकू नव्हताच. सावकार-मालगुजारांना लुटून तो गरिबांना वाटून टाकी. दुष्काळात सावकारांची आणि सरकारी धान्याची गोदामं फोडून गरिबांना मोफत धान्य वाटू लागला. गरजूंना बिनव्याजी कर्ज देऊ लागला. स्रियांना तो पाठीराखा वाटत होता. गरिबांचा वाली, त्यांचा रक्षणकर्ता, जंगलचा सार्वभौम राजा अशी त्याची प्रतिमा जनमाणसांत बनली होती. त्याच्या जिवंतपणीच खानदेश -नर्मदा खोऱ्यात दंतकथा बनला होता. त्याच्या कथा आणि गीतं घराघरात पोहोचली होती.
ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते, त्याच काळात हा भिल्ल नायक आदिवासी-किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्याचा एकाकी लढा देत होता.
ज्या काळात होळकर, निजाम, झिंदे अन् इतर संस्थानिक ब्रिटिझ सत्तेची हुजरेगिरी करण्यात मशगुल होते, त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता. अकरा वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. त्याची एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पान आहे.
तंट्याला पकडण्यासाठी १०,५०० रुपये आणि पंचवीसशे एकर जमिनीचे बक्षीस ब्रिटिशांनी देऊ केले. होळकरांनी वेगळे बक्षीस ठेवले. ‘तंट्या पोलिस’ नावाची स्वतंत्र फौज स्थापन केली. गावागावांत तंबू उभे करून पोलिस चौक्या उभ्या केल्या. मालगुजारांना मोफत शस्त्रे वाटली; तरीही हा वीर अकरा वर्ष पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन डोंगरदर्यांत तळपत होता.
तंट्याचे जीवन मानवतेचा संदेश देणारे होते. त्याच्यात नेतृत्वाचे सगळे गुण होते. तो निःस्वार्थी होता. स्वतःसाठी त्याने काही ठेवले नाही. त्याची प्रचंड बुद्धिमत्ता, चपळाई, प्रसंगावधान, दयाळूपणा, सभ्यपणा, न्यायीदृष्टी, उदार दृष्टिकोन – या गुणांबद्दलच्या लोककथा – लोकगीते गावोगाव पसरली होती. हे सारे तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रव्यवहारात अहवालात नमूद करून ठेवले आहे.
आदिवासी – शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक होता तंट्या. त्याने सातपुडाच्या दोन्ही भागांतील – खानदेश व नर्मदा खोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांत राष्ट्रीयत्वाची भावना जागवली.
दुर्दैवाने इतिहासात तंट्याची नोंद एक डाकू व दरोडेखोर अज्ञीच झाली आहे. इतिहास लिहिणाऱ्यांनी गुन्हेगार जातीत जन्मलेल्या तंट्या भिल्लावर हा अन्याय केला होता. महाराष्ट्रातील लोककथा, लोकनाट्य, पोवाडे आणि लोकगीतांतही तंट्या लोकांसमोर येत होता; परंतु एक डाकू आणि दरोडेखोर हा कपाळावर डाग घेऊनच.
एक दशक हा क्रांतिवीर बेदखल राहिला. तंट्याचा शोध घेत असताना सेंट्रल प्रॉव्हिन्स अँण्ड बेरार, बॉम्बे प्रॉव्हिन्सेस, इंदोर दरबारच्या पुरातत्व खात्यात धुंडाळा घेतला. तंट्याबद्दलची मूळ पोलिस कागदपत्रे, न्यायालयीन दस्तऐवज, उपलब्ध लोकगीतं ह्यातून तंट्याचं हे चरित्र समोर आलं. या आदिवासी क्रांतिवीराची ओळख करून देताना तंट्याच्या क्रणातून मुक्त झाल्याचं वेगळं समाधान मिळालं आहे. नव्या पिढीला तंट्याचं जीवन या पुस्तकाच्या निमित्ताने देता आलं याचा आनंद आहे.
– बाबा भांड
तंट्या भिल्लासंबंधी बाबा भांड यांची इतर प्रकाशने
- तंट्या कादंबरी २०००
- Jananayak Tantya Bhil, And The Reasant And Tribal Movement : Source Material, 2001
- एका जननायकाच्या झोधाची कहाणी, २००२
- आदिवासी क्रांतिवीर तंट्या भिल्लाची गोष्ट, २००२
Reviews
There are no reviews yet.