लेखकाचे हृद्गत
मराठ्यांच्या इतिहासापैकी थोरले शाहू महाराजांपासून पेशवाई अखेरच्या कालखंडाचा इतिहास लिहिण्याचे काम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने माझ्यावर सोपविले होते. ह्या कालखंडाचा इतिहास आपल्या पूर्वजांनी शौर्य, वीर्य, तेज आदी गुण दाखवून घडविला, त्याबद्दल आपण सर्व महाराष्ट्रीयांस जास्त आपुलकी व जवळीक वाटते व तो इतिहास सर्वाना आवडतो.
पेशवा कालखंड लिहित असता या सर्व कालखंडांचा इतिहास ७०० पृष्ठात सामाविला जाईल असा प्रयत्न या ठिकाणी मी केला आहे. ह्या कालखंडातील पेशवे व शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन आदी मातब्बर सरदार या एकेकट्यांचा साद्यंत इतिहास लिहावयाचा तर त्यासही ७०० पृष्ठे खर्ची पडतील, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे हे वीर पुरुष आहेत. अशा परिस्थितीत हा इतिहास लिहिताना मला नाइलाजास्तव बरीच काटछाट करावी लागली आहे. थोरले बाजीराव, महादजी शिंदे, होळकर यांच्या पराक्रमांचे वर्णन करताना सर्व शरीर रोमांचित होते आणि दुसरा बाजीराव, दौलतराव शिंदे व उत्तर कालातील मराठे सरदारांना एकएकटे गाठून इंग्रजांनी त्यांचा केलेला पराभव हे लिहित असता मन उद्विग्न होते व रडू कोसळते. असा हा हर्षामहर्षाचा मराठी राज्याचा इतिहास माझ्या हातून लिहून पुरा करून घेतला, ह्याबद्दल त्या जगन्नियंत्याचे मी आभार मानतो. एवढे मोठे काम एकहाती करत असता काही उणिवा व चुका होणे अपरिहार्य आहे ह्याची जाणीव मला आहे.
– लेखक
प्रस्तुत खंडाचे लेखन डॉ. खोबरेकर यांनी केले असून या कालखंडात इ. स. १७०७ ते १८१८ पर्यंतचा इतिहास देण्यात आला आहे. उपलब्ध नवीन संदर्भ व संशोधन यावरून हे लेखन डॉ. खोबरेकर यांनी केले असून वाचक या एकत्रित इतिहासाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Digital Book