प्रस्तावना
हैदराबादचा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे पान. निझाम आणि इत्तिहाद्उलू मुस्लिमीन यांच्या रझाकारी शोषणापासून आणि अत्याचारापासून ज्यांनी हैदराबादला मुक्त करण्याकरिता अटीतटीचे प्रयत्न केले त्या स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, काजीनाथराव वैद्य, केशवराव कोरटकर, के. व्ही. नरसिंहराव, अच्युतभाई देशपांडे, रघुनाथराव रांजणीकर, सीताराम पप्पू, विजेंद्र कावरा या मंडळींच्यावरोबर ‘हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम’या ग्रथांचे लेखक शंकरभाई पटेल यांनी काम केले आहे. जेव्हा एखादा प्रसिद्ध इतिहास लिहिला जातो तेव्हा त्यात काही खरे, काही खोटे येऊ शकते. अशा वेळी भिन्न मताच्या लोकांनी मांडलेला इतिहास जपून ठेवणेही आवश्यक असते. हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामावर वसंत पोतदार यांनीही ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात अनेक चुका आहेत असे शंकरभाई पटेल यांचे म्हणणे. हीच गोष्ट अच्युत खोडवे यांना पण जाणवली. माझे मित्र अनंतराव भालेराव यांनी याच लढ्यावर “पेटलेले दिवस’ नावाचे पुस्तक लिहिले. उमरी बँक लुटण्याची घटना आणि नांदेडमधील चाउस इत्यादींच्या संबंधातल्या असलेल्या घटनांचा त्यांनी उल्लेख केला. आमचे दुसरे मित्र रघुनाथराव रांजणीकर यांना अनंतराव यांच्या कथनात काही त्रुटी जाणवल्या. वस्तुस्थिती अशी असते की, एखाद्या प्रदेशाचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा निरनिराळे इतिहासकार आणि त्या घटनेचे साक्षीदार यांनासुद्धा त्या इतिहासाचे सगळेच पापुद्रे माहीत नसतात आणि त्यांना त्यामुळे या घटनांत वेगवेगळा अर्थ जाणवतो. अशा वेळी ज्यांना जे सांगावयाचे आहे त्यांचे एकदा सांगून होणे महत्त्वाचे ठरते. कारण इतिहास म्हणून जे सांगितले जाते ते इतिहासाचे साधनमात्र असते. त्यामुळे जे जे हैदराबादवर इतिहास लिहिले गेले ते केवळ स्वकपोलकल्पित असले तरी ते प्रसिद्ध केले पाहिजेत असे मला वाटते.
यादृष्टीने अनंतराव भालेराव, वसंत पोतदार यांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेतच. तसेच शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथालाही ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. उद्या श्री. सीताराम पप्पू किंवा दामोदर पांगरेकर किंवा के. व्ही. नरसिंहराव आदी लोक हैदराबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहितील तेव्हा त्यालाही एक महत्त्व राहणार आहे. शंकरभाई पटेल हे एक मोठे कार्यकर्ते. त्यांचा अनुभव फार मोलाचा. शंकरभाई यांचे वय आता बरेच झाले आहे. त्यांनी यावेळी हा ग्रंथ लिहून पुढील पिढीवर मोठे उपकार करून ठेवले आहेत. आपला अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हेही एक मोठे समाजकार्यच असते. ते शंकरभाई पटेल यांनी पुरे केले आहे. आपले लेखन हे आपल्या अपत्यासारखे असते. आपले मूल वेळीच घरी परतले नाही तर आईच्या मनात हुरहूर लागते. या पुस्तकास विलंब लागत आहे असे पाहून शंकरभाईंनाही हुरहूर लागणे स्वाभाविक आहे. पण लेखनानंतरच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असतो. शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथ-प्रकाशनास विलंब लागला, त्यास साहित्य आणि संस्कृती मंडळाचा नाईलाज होता. हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात मंडळाकडून कोणतीही कुचराई झाली नाही असे मी शंकरभाई पटेल यांना आश्वासन देतो. हा ग्रंथ प्रसिद्ध करताना मंडळास आनंद होत आहे हे सांगणे नकोच.
सुरेन्द्र बारलिंगे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
२ ऑक्टोबर १९८६
Digital Book