एका अशिक्षित स्त्रीची गांवळळ भाषेतील गाणी म्हणून कित्येक वर्षे बहिणाईंची कविता उपेक्षितच राहिली. पण देह कष्टांत बुडालेला असताना स्वतःच्या नश्निबी आलेले वैधव्य, वडिलमुलाचे अपंगत्व आणि एकुलत्या एका लाडक्या मुलीला सासरी असणारा जाच या तिहेरी दुःखाचा सलही उरी दडपावा लागे. या कष्टांवर आणि दुःखावर उतारा म्हणजे त्यांच्या काव्याने त्यांना दिलेली आयुष्यभराची साथ! कणखर आत्मविश्वासाने जीवनांतील समर प्रसंगांशी त्यांनी दिलेली टक्कर हे त्यांचे लौकिक कर्तृत्व तर खरेच पण निर्मितीची यत्किंचितही जाण नसता त्यांनी चिरंजीव केलेले त्यांचे काव्य हे त्यांचे त्याहूनही मोठे अविनाशी असे वाड्मयीन कर्तृत्व होय. केवळ कर्तव्य
बुद्धीने त्यांनी व्यावहारिक कर्तृत्व गाजविले तद्वतच केवळ विरंगुळा म्हणून त्यांचे काव्य निर्माण झाले. त्यांच्या कविता संग्रहाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध झाली, तीही त्यांच्या मृत्यूनंतर. म्हणजेच ज्या सहजपणाने त्यांची कविता जन्मली, त्याला कर्तृत्वाच्या अहंकाराचा हलकासाही स्पर्श न होता ही निसर्गकन्या आपला अमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवून अनंतात विलीन झाली.