Description
निवेदन
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अज्ञा व्यक्तींची साधारणतः शंभर ते सव्वाज्ञे पानाची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्राचे शिल्पकार” या योजनेअंतर्गत पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील “लोककवी शाहीर रामजोशी” हा तेविसावा चरित्रग्रंथ आहे.
शाहीरांचं मराठी कवितेला मिळालेलं योगदान विशेषत्वानं लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या काळात मराठी कविता पांडित्याच्या जोखडात अडकून पडलेली होती, आध्यात्माशिवाय अथवा भक्तीशिवाय इतर विषय जिनं वर्ज्य मानलेले होते त्या काळात शाहीराने आध्यात्म्याच्या जोखडातून तिला मुक्त केले. भक्तीशिवाय अथवा आध्यात्माशिवाय इतरही विषय कवितेचे विषय होऊ शकतात हा आत्मविश्वास लोकांच्या मनात जागविला. इतकेच नव्हे तर लावणीच्या रूपानं तिला जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचं ऐतिहासिक कार्य केलेलं आहे. शाहीरांचं हे ऋण मराठी कवितेनं मान्य करायलाच हवे.
लोककवी शाहीर रामजोशी हा शाहीरांचा मुकूटमणी आहे आणि म्हणूनच “महाराष्ट्राचे शिल्पकार” या मंडळाच्या चरित्रग्रंथमालेअंतर्गत या शाहिरावरचा चरित्रग्रंथ प्रकाश्रित करण्यात मंडळाला विशेष आनंद होत आहे. प्रा. शिरीष गंधे यांनी या चरित्रग्रंथाचे लेखन समरसून तर केलेले आहेच; पण त्याशिवाय चरित्रग्रंथासाठी रूढ असलेल्या लेखन पद्धतीचा अवलंब न करता कथात्मक लेखन पद्धतीचा अवलंब केला आहे. प्रसंगाची मांडणीही अतिशय नाट्यपूर्ण रीतीने कलेली आहे. अर्थात अज्ञा लेखन पद्धतीचा अवलंब केल्यास चरित्रग्रंथात काही त्रुटी संभवतात; पण या ग्रंथात अशा त्रुटी अभावानाच आढळतात.
कथात्मक स्वरुपाच्या लेखनाला पोषक असलेली शैली मूलतः प्रा. शिरीष गंधे यांना लाभलेली आहे. शाहीर रामजोशींच्या निधनामुळं निर्माण झालेल्या स्थितीचं खाली उद्धृत केलेलं वर्णन या संदर्भात पुरेसं बोलकं आहे, असं मला वाटतं.
मराठी काव्यसुंदरीच्या पायातील घुंगरु निखळले, डफ अबोल झाला, वीणेचा झंकार थांबला, ढोलकीवर बंद बोल पडला. मराठी भाषेत नितांतसुंदर लावणी रचना करून, मराठी शारदेची उपासना करणारा सच्चा उपासक काळाच्या पडद्याआड गेला. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांना जोडणारा साकव कोसळून पडला. सामान्य माणसांच्या प्रेमापोटी घरातून बाहेर पडलेली पावलं अगतिक झाली तर डफावर नर्तन करणारी बोटे कायमची विसावली.
लौकिक अर्थानं शाहीर रामजोशींची बोटं भलेही विसावली असतील; पण या बोटातून झरलेली कवनं अजरामर झालेली आहेत.
रा. रं. बोराडे – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
दिनांक : १९ मे, २००४
Reviews
There are no reviews yet.