लेखक घर बांधतो

ख्यातनाम कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी पुण्यात आपल्या मनाप्रमाणे बांधलेल्या ‘अक्षर’ या वास्तूचे अतिशय हृद्य वर्णन त्यांच्या ‘लेखक घर बांधतो’ या लेखात केले आहे. हे घर साहित्य-कला-संस्कृतीच्या असंख्य मैफलींनी नेहमी निनादत राहिले. आज काळाच्या तकाज्याने लेखकाचे हे घर अस्तंगत होते आहे. पण अनेकांच्या आठवणींत घर करून राहिलेल्या या घराच्या उभारणीच्या दस्तुरखुद्द लेखकानेच सांगितलेल्या आठवणी आम्ही संपादित रूपात पुनर्मुद्रित करीत आहोत.  

लेखक घर बांधतो

गृहस्थाश्रमी होऊन एक-दीड तप लोटलं तरी मला घर नव्हतं. अन्न आणि वस्त्र मिळवण्याच्या कामी मी एवढा जुंपलो होतो, की स्वत:च्या डोक्यावर स्वत:च्या मालकीचं छप्पर असावं, असा विचार कधी चुकूनही मनात आला नाही. थोडी मिळकत होऊ लागली तेव्हा, आपल्याला एक-दोन खोल्या भाडय़ानं घेता आल्या तर किती बरं होईल, असं वाटू लागलं.

पुण्यासारख्या शहरात तेव्हा भाडय़ाचं घर दुर्लभ नव्हतं. आणि भाडं परवडण्यापलीकडचं नव्हतं. भाडेकरू आणि मालक हे नातं कोर्टकचेऱ्यांकडे धावण्याइतकं ताणलं जात नव्हतं. ‘भाडय़ाचं घर आणि खाली कर’ ही म्हण भाषेतून गेलेली नव्हती. मुंबई सोडून मी पन्नास साली पुण्यात आलो आणि भाडय़ाच्या दोन खोल्या मिळवल्या.

नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती. कुठलीही शैक्षणिक पदवी माझ्यापाशी नव्हती. वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षणाकडं पाठ फिरवून मी ऑगस्ट, बेचाळीसच्या लढय़ात सामील झालो होतो. करता येतील असे दोन उद्योग मला दिसत होते. कागदावर रेघोटय़ा ओढणं किंवा चार अक्षरं लिहिणं. रेघोटय़ा ओढण्याची नोकरी काही काळ मी करून पाहिली. दिवसाला एक रुपया एवढीच कमाई झाली. लेखनावर थोडी अधिक कमाई करता येई. एक कथा लिहिली की सात रुपये मिळत. पण रोज एक कथा सुचत नसे आणि लिहूनही होत नसे. अशी मिळकत असलेल्या माणसाला आपण घर बांधावं, हे कसं सुचेल?

पुढं पंचावन्न साली मला बऱ्या पगाराची नोकरी मिळाली. ग्रामीण कार्यक्रमांचा संयोजक म्हणून पुणे आकाशवाणी केंद्रावर मी रुजू झालो.

लवकरच महाराष्ट्र सरकारची पुस्तकांना पारितोषिकं देण्याची योजना सुरू झाली. ‘गावाकडच्या गोष्टी,’ ‘बनगरवाडी,’ ‘उंबरठा,’ ‘जांभळाचे दिवस’, ‘घरदार’ या पुस्तकांना पारितोषिकं मिळाली आणि जवळपास आठ हजार रुपये बँकेत जमा झाले. या पैशाचं काय बरं करावं, असा प्रश्न माझ्यापुढं उभा राहिला. हे करावं का, ते घ्यावं का, असं करता करता, या पैशांतून उत्तमोत्तम ग्रंथ खरेदी करावेत आणि आपलं आपलं असं एक सुरेख गं्रथालय करावं, हा विचार बळावला. बराच विचार करून अक्षरं लिहून मिळवलेलं हे धन अक्षरं वाचण्याच्या कामीच खर्च करायचा निर्णय मी घेतला.

ही कल्पना मी बायकोपाशी उत्साहानं बोललो.

तिला ही योजना आवडली.

दोन दिवस गेल्यावर तिनं मला विचारलं, ‘‘पण एवढी पुस्तकं घेऊन ठेवणार कुठं? भाडय़ाच्या दोन खोल्यांत?’’

‘‘एका खोलीत भिंतीपासून आढय़ापर्यंत पुस्तकांची शेल्फं करायची. तीच बसा-उठायची खोली. आपलं उठणं-बसणं पुस्तकांच्या संगतीत होणं केव्हाही बरंच.’’

‘‘भाडय़ाचं घर केव्हा खाली करायला लागेल, ते सांगता येतं का? सतत पुस्तकं इकडून तिकडं हलवावी लागतील. वज राहणार नाही.’’

‘‘मग काय करू या?’’

‘‘आपण पगारातले पैसे साठवू आणि स्वत:च्या दोन खोल्या बांधू. तिथं हवी तितकी पुस्तकं ठेवली तरी हलवावी लागणार नाहीत.’’

मी बरं, बरं म्हणालो. पण पगारातले पैसे साठवून घर बांधणं ही मला राक्षसी महत्त्वाकांक्षा वाटली.

ग्रंथालयाची योजना मागं पडली. पारितोषिकांच्या रकमेतून निदान जमिनीचा तुकडा घेऊ, असं उभयतांच्या विचारानं ठरवलं. मी फार जंजाळात न शिरता ठरवलं की, शहरातल्या गर्दीच्या भागाला, वाहत्या रस्त्याला फटकूनच जागा असावी. तिथं रात्री, पहाटे आणि दुपारी शांतता घरात यावी. आजूबाजूला बरंच मोकळं रान, प्रौढ वृक्ष, गवत, झुडपं असावीत. टेकडीचा आणि वाहत्या खळाळत्या पाण्याचा शेजार असावा. जिथं घर बांधू ती जागा तरी ऐसपैस पाहिजेच. अंगण, परसू, फुलझाडं, फळझाडं, वेली लावता आल्या पाहिजेत. सकाळचं कोवळं ऊन घरात रांगलं पाहिजे आणि रात्रीचा चंद्रप्रकाश अंगणात उतरला पाहिजे. इतकं सगळं एकत्र मिळणं कठीणच; पण अपेक्षा ठेवणं काही कठीण नाही.

माझे वडीलबंधू ग. दि. माडगूळकर हे बरीच वर्षे डेक्कन जिमखाना भागातल्या इंजिनीअर एन. जी. पवारांच्या बंगल्यात भाडय़ानं राहत होते. त्यामुळं पवारांशी आमचा घरोबा होता. जागा घ्यायची ठरल्यावर मला पहिल्यांदा आठवण झाली ती पवारसाहेबांची. या कामी सुज्ञांचा सल्ला घ्यावा, म्हणून मी वयानं साठीच्या आणि अनुभवानं बरोबरीच्या लोकांच्या पुढं असलेल्या पवारसाहेबांकडे गेलो. ते मला म्हणाले, ‘‘अरे वा! तुम्हालाच जागा हवी, तर इथं जिमखान्यावर माझ्या पाहण्यात असलेले मोकळे प्लॉट मी तुम्हाला दाखवतो. पसंत करा, पुढं बघू.’’

मग पवारसाहेबांच्या छोटय़ा गाडीतून आम्ही बरंच हिंडलो. एक-दोन-तीन दिवस हिंडलो.

प्रभात रस्त्याला समांतर असा काळय़ाकरंद जमिनीचा एक लांब-रुंद तुकडा होता आणि त्यात नव्यानंच प्लॉट पाडले गेले होते. जागोजागी डेरेदार अशी आंब्याची झाडं होती. शाल्मलीची झाडं होती. कवठाची, चिंचांची होती. पलीकडे पेरूच्या बागा होत्या. पश्चिमेला हनुमान टेकडी होती. जवळच वाहता कॅनॉल होता. आणि वाहनं जातील-येतील असा रुंद रस्ता नव्हता. दोन्ही बाजूंना टणटणीच्या गच्च जाळय़ा माजलेल्या. पायवाटेनं रमतगमत गेलं, कर्वे रस्ता ओलांडला की मुठा नदीचं विशाल पात्र होतं. राहत्या घराच्या आसपास आणखी काय लागतं?

ही जागा मला आवडली. किंमत फार नसली तर ती मला घ्यायची आहे, असं पवारसाहेबांना सांगताच त्यांनी मालक कोण, किंमत काय, ही सगळी चौकशी केली. मोठा रघुनाथ आणि छोटा रघुनाथ अशा मारवाडी बंधूंचे हे प्लॉट होते. अद्यापि रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज हे व्हायचं होतं. एक रुपया दोन आणे ही चौरस फुटाची किंमत होती. मी पसंत केलेला प्लॉट पाच हजार पाचशे पंच्याहत्तर चौरस फुटांचा होता.

दिघे नावाचे कोणी परिचयातले वकीलही पवारसाहेबांनी मला गाठून दिले. त्यांनी खरेदी व्यवहारातील कायदेशीर बाजू सांभाळली आणि एका उत्तम दिवशी पुस्तकांना पारितोषिक म्हणून राज्य शासनाकडून मिळालेली रक्कम खर्ची घालून मी एरंडवणा भागातील एका लहानशा शेतजमिनीच्या तुकडय़ाचा मालक झालो.

घर बांधण्याची कल्पना बोलून झाली होती; पण हजारो रुपये जमवून ही कल्पना आपण प्रत्यक्षात आणू, असं मला मुळीच वाटलं नव्हतं.

मुंबई रस्त्यावरच्या भाडय़ाच्या घराला कुलूप ठोकून कधीमधी मी, बायको आणि लहान मुलगी ज्ञानदा असे प्रभात रस्त्याच्या बाजूला असलेल्या या मोकळय़ा शेतजमिनीत येऊन बसत असू. संध्याकाळची वेळ असे. कॅनॉलच्या पाण्याचा गारवा आणि पेरूच्या बागेचा वास घेऊन वारा आमच्याशी झोंबऱ्या गोष्टी करत असे. ज्ञानदा रानफुलं गोळा करी आणि मी पुढच्या गोष्टी बोलत असे. जणू काही या काळय़ा जमिनीत पाऊस पडून वाफसा आलेला आहे आणि मी बी टोकतो आहे.

‘‘हे बघ- फार झालं, तर वयाच्या चाळिसाव्या वर्षांपर्यंत मी चरितार्थासाठी चाकरी करीन; पुढं नाही. या जागी आपण दगड-मातीच्या भिंती, कडुनिंबाचे वासे, नळीच्या कौलांचं छप्पर, जांभळीच्या लाकडापासून केलेली दारं- असं स्वस्तातलं लहान घर बांधू. मोकळय़ा राहिलेल्या जमिनीत आंबा, रामफळ, पेरू, केळी असली फळझाडं अन् गुलमोहर, बाहवा, चाफा, प्राजक्त असे फुलणारे वृक्ष लावू. मग मी लिहिणं, वाचणं, चित्रं काढणं, अधूनमधून प्रवास करणं, शिकारीला जाणं, वारंवार नदी, डोंगर, जंगल यांच्याकडे धावणं- असं करत राहीन.’’

हिचा काही विरोध नसे. बाजारात तुरी होत्या, मग मारामारी कशासाठी, असा तिचा विचार असावा.

जमीन घेऊन काही महिने झाले. ‘माणदेशी माणसं,’ ‘जांभळाचे दिवस,’ ‘तू वेडा कुंभार’ या माझ्या पुस्तकांचे प्रकाशक अनंतराव कुलकर्णी यांना ही बातमी लागली.

एकवार त्यांनी विचारलं, ‘‘काय, रे, प्लॉट घेतला आहेस म्हणे?’’

‘‘हो. पारितोषिकाचे पैसे होते, ते वायफळ खर्चायची बुद्धी होईल म्हणून प्लॉट घेऊन टाकला.’’

‘‘छान, छान! घर कधी बांधणार?’’

‘‘घर बांधायचं म्हणजे काय खेळ आहे काय अनंतराव? एवढे पैसे आणायचे कुठनं?’’

‘‘सुरुवात केली म्हणजे अडत नाही.. होतं पुरं. काहीही व्यापताप करून माणूस घर पुरं करतोच. सुरुवात तर कर. माझ्या शेजारी वीटवाले देसाई आहेत, त्यांना सांगून मी तुला विटा देतो. राजूरकर माझ्या नात्यातलेच आहेत. ते लागेल तेवढं लाकूड देतील. त्याचे पैसे सावकाश दिलेस तरी चालतील. अरे, लेखकाचं घर होतंय, यात आनंद आहे.’’

‘‘रोख पैसे लागतील, ते कुठनं आणू?’’

‘‘तुझ्या पुस्तकांच्या रॉयल्टीपोटी मी आगाऊ रक्कम देतो; मग झालं?’’

इतकं बोलणं झाल्यावर मला उमेद आली. इंजिनीअर पवारसाहेब म्हणालेच होते की, तुमचं घर आम्ही बांधून देऊ.

घराचं डिझाइन कुणाकडून घ्यावं? माधवराव आचवलांचं नाव चट्कन समोर आलं. लेखकाचं घर कसं असावं- हे लेखक, समीक्षक असलेल्या आर्किटेक्ट माधवरावांइतकं आणखी कुणाला कळणार?

बडोद्याला मी पत्र लिहून टाकलं : ‘घरं बांधावं असा विचार आहे. डिझाइन तुम्हीच करावं असा आग्रह आहे.’

आचवलांनी आनंदानं काम स्वीकारलं. १०-०१-६० च्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं : ‘काम करण्यास मला आनंद वाटेल. लेखकमित्रांपैकी घर बांधायला निघालेले आपण पहिलेच. शिवाय बाकीच्यांचा माझ्याकडून घर डिझाइन करून न घेण्याचा निश्चय आहे! ते फ्लोटिंग स्पेस वगैरे खटले आपल्याला नको, असं म्हणतात. अडचण एक अशी आहे की, इतक्या दूर असल्यामुळं डिझाइनची स्केचेस करून देण्यापलीकडे मला काही करता येईलसं वाटत नाही. तुम्ही दुसऱ्या कुणा आर्किटेक्टवर मी केलेलं डिझाइन बांधून घेण्याचं काम सोपवलंत तरी त्याला त्यात रस वाटणार नाही. आणि ते साहजिकच आहे.’

ही अडचण लिहून आचवलांनी दोघा स्थानिक आर्किटेक्टस्ची नावं मला कळवली होती आणि त्यांच्या कामाबद्दल मला आदर आहे, असं म्हटलं होतं. पण माझा आग्रहच होता की, डिझाइन आचवलांचंच पाहिजे. मग, माझी त्यांना आणि त्यांची मला- अशी पत्रं सुरू झाली. पत्रापत्रांतून घराला आकार आला.

घराविषयी माझी कल्पना मी कळवली. चौसोपी वाडय़ातला प्रशस्तपणा या घराला असावा. ते बैठंच हवं. घराला छप्पर पाहिजे, माळा पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे- बाजूला दार बंद केलं की घरापासून वेगळं होता येईल अशी माझी म्हणून एक खोली असावी. तिच्यात पुस्तकांसाठी म्हणून एक भिंतभर कपाट किंवा शेल्फ. चित्रं रंगवायला भरपूर उजेड. घराला अंगण आणि परसू पाहिजे. घरापैकी काही भाग- अगदी एखाद् दुसरी खोलीही भाडय़ानं देण्याची बुद्धी कधी होऊ नये अशी त्याची रचना असावी. बास!

माझ्या आठवणीप्रमाणं आचवलांनी सोळा ड्रॉइंग्ज दुर्गाबाई भागवत यांच्याबरोबर बडोद्याहून माझ्याकडं पाठवली. ती सगळीच उत्तम होती. त्यातलं मला सर्वोत्तम वाटलं ते पसंत करून मी सर्व तपशिलाचे नकाशे पाठवावेत, असं आचवलांना कळवलं.

घर बांधणं म्हणजे एक प्रचंड खटाटोप असतो. माझा सगळा भरवसा पवारसाहेबांवर होता.

अचानक एक दुर्दैवी घटना घडली.

इंजिनीअर पवारसाहेब गेले.

माझ्यापुढं मोठाच प्रश्न उभा राहिला : घर बांधणार कोण? पवारसाहेबांइतक्या आपुलकीनं काम करणारा माणूस मला आता दुसरा कोण मिळणार? या कामी आता सल्ला कुणाचा घ्यावा?

माझे वडील जेव्हा संस्थानी नोकरीत होते, तेव्हा इंजिनीअर नानासाहेब केळकरही तिथं होते. त्यांची आठवण झाली. हे स्वच्छ आणि कर्तबगार अधिकारी तूर्त पुण्याला होते. शनिवारवाडय़ानजीक असलेल्या नानांच्या ऑफिसात जाऊन मी त्यांच्यापुढं बसलो. म्हणालो, ‘‘नाना, मी घर बांधतोय. तुमच्या ओळखीचा, चांगलं काम करणारा माणूस मला सुचवाल का? माझं डिझाइन नीटपणे प्रत्यक्षात आणील आणि मला खर्चाच्या खोल खड्डय़ात घालणार नाही असा प्रामाणिक आणि आपलेपणानं काम करील, असा कोणी तुम्हीच देऊ शकाल.’’

नाना हसून म्हणाले, ‘‘असा माणूस कुठून आणू? तरी पण तू घर बांधतो आहेस, ही आनंदाची गोष्ट आहे. माझे एक इंजिनीअर मित्र आहेत- सी. व्ही. कुलकर्णी म्हणून. ते उद्या इथं येतील. तूही ये. आपण बोलू.’’

हे कुलकर्णी दिसा-बोलायला नानांचे मित्र शोभावेत असेच होते.

नाना त्यांना म्हणाले, ‘‘बाबा रे, हा मुलगा पैसेवाला नाही, लेखक आहे. औंध संस्थानातला आणि आमच्या बापूंचा मुलगा आहे. त्याचं घर चांगलं बांधून दे. आणि मुख्य म्हणजे त्याला खर्चाच्या खड्डय़ात घालू नकोस. ’’

कुलकण्र्यानी मान डोलावली. हसले. मला म्हणाले, ‘‘अनुभवानं कळेल.’’

पुढं मला अनुभव आला. कुलकण्र्याचं काम चोख. हयगय नाही. अनुभव मोठा. एखादी गोष्ट स्पष्ट बोलायची, तर कुलकर्णी आधी परवानगी घेत.

हळूहळू सगळे तपशील असलेले नकाशे आचवलांकडून आले. अगदी अभ्यासिकेतलं पुस्तकांचं शेल्फ, हॉलमधल्या भिंतीवरचं एखाद्या पेंटिंगसारखं दिसणारं शेल्फ, भिंतीतली कपाटंोांसुद्धा बारीकसारीक तपशील मिळाले. ‘या घरासाठी लागणारं फर्निचरही मी डिझाइन करीन आणि तुमच्याकडं पाठवीन. घरालाच पुष्कळ खर्च येईल. त्यात एवढय़ात फर्निचरचा खर्च नको. मागाहून पाठवीन,’ असंही आचवलांनी कळवलं होतं.

फी किती पाठवायची, असं मी विचारलं, तेव्हा पत्र आलं- ‘तुम्हाला फी नाही. घर कसं दिसेल, हे कळण्यासाठी मला घराचं प्लायवूडमध्ये मॉडेल करायचं आहे. त्याचा खर्च दोनशे रुपये. तेवढेच तुम्ही द्यायचे.’

लवकरच घराचं सुंदर मॉडेल माझ्याकडं आलं. पुढून, बाजूंनी, मागून घर डौलदार, साधं, वेगळं होतंच. छप्पर उचलून आत पाहिलं की आतला लोभस घरगुतीपणाही मोह घालील असा होता.

माधवरावांचं म्हणणं होतं की, घर चुन्यात बांधा. छप्पर सिमेंट पत्र्याचं करा. ते पुढं काळे पडू नयेत म्हणून रंगीत पत्रे घ्या- हिरवे किंवा तांबडे. हे घर बांधायला चोवीस हजार रुपये खर्च येईल. जास्ती आला, तर तुमचं काही चुकलं, असं समजा.

अनंतराव कुलकण्र्यानी मला रॉयल्टीपोटी बारा हजार रुपये दिले. वर्षांला मला मिळणाऱ्या रॉयल्टीतून ते फेडायचे होते. ‘मानिनी,’ ‘रंगपंचमी’, ‘वैजयंता’, ‘भल्याची दुनिया’ अशा काही चित्रपटलेखनानं काही पैसे दिले. देसायांनी विटा दिल्या. राजूरकरांनी दारं, खिडक्या, वासे, चौकटी दिल्या. नाना केळकरांनी कंट्रोलचं सिमेंट आणि लोखंड दिलं.

घराच्या बांधकामाला सुरुवात झाली. काळी जमीन असल्यामुळं पायासाठी फार खोल जावं लागलं. उत्तरेच्या बाजूला तर आठ फूठ पाया गेला. भात उकरावा तशी काळी माती उकरली गेली. ‘काळी माती.. बांधकामाला विष’ हे कुलकण्र्याचं मत माझ्या मनात पुरतं भिनलं. आचवलांनी दिलेला खर्चाचा अंदाज पायापासून चुकायला सुरुवात झाली.

पानशेतचं धरण फुटलं आणि कधी नाही अशी प्रचंड पडझड, वाताहत, राड पुणे शहरानं पाहिली. अनेक संसार वाहून गेले.

माझं बांधकाम बंद पडलं. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामी कारागीर गुंतले.

बंद पडलेलं बांधकाम पुन्हा सुरू झालं तेव्हा कामगारांपासून बांधकाम साहित्यापर्यंत सगळंच महागलं होतं. विटांचे साठे कारखानदारांकडून सरकारनं आपल्या ताब्यात घेतले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं विटा मिळत होत्या.

साठवणीचं पाणी फार दिवस पुरत नाही. कामगारांचा रोजगार, खिळेमोळे, डबर, मुरूम, वाळू, कडय़ा-कोयंडे, तारा-सळय़ा यांना प्रत्येक शनिवारी पैसे पुरवता पुरवता मी बेजार झालो. जवळ होते ते पैसे चिरमुऱ्यांसारखे संपून गेले.

माधवरावांनी पुन:पुन्हा बजावलं होतं- ‘कर्ज काढून घर बांधू नका. तो बोजा वागवून घरात सुख लागत नाही.’

अधिक खर्च भरून काढायचा कशातनं? मला कर्ज तरी कोण आणि कशावर देणार?

एक प्रकाशक उपयोगी पडले होते; दुसरेही पडतील, असा भरवसा होता. जिवाचा धडा करून मी मौज प्रकाशनाच्या भागवतांना पत्र लिहिलं-

‘‘मी अडचणीत आहे. तुमच्याकडं असलेल्या ‘बनगरवाडी’, ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘काळी आई’, ‘उंबरठा’ या सगळय़ा पुस्तकांचे कायमचे हक्क घेऊन तुम्ही मला या अडचणीतून बाहेर काढू शकाल.’’

यावर विष्णुपंत भागवतांनी मला कळवलं, ‘तुमच्या अडचणीच्या वेळी पुस्तकांचे कायमचे हक्क घेणं नैतिक दृष्टीने योग्य वाटत नाही. तुमची गरज कळवावी. रॉयल्टीपोटी किती रक्कम देता येईल, ते पाहू.’

– आणि याही प्रकाशकांकडून मला बारा हजार रुपये एवढी रक्कम मिळाली. घराचं बांधकाम सुरू राहिलं.

आचवलांनी सूचना केली होती : घर चुन्यात बांधा.

कुलकर्णी आधी परवानगी घेऊन यासंबंधीही स्पष्ट बोलले होते, ‘‘हल्ली चुना खात्रीशीर मिळत नाही. सिमेंटच वापरणं आपल्या हिताचं आहे.’’ भिंती उभ्या राहत असतानाच आचवल अकस्मात बघायला आले. एकूण बांधकाम, भिंतीची धरलेली रुंदी बघून त्यांनी विचारलं, ‘‘माडगूळकर, तुम्ही काय शनिवारवाडा बांधताय काय! भिंती एवढय़ा रुंद कशाला?’’

कुलकण्र्याचं यावर म्हणणं असं : ‘‘उद्या तुमच्या मुलाबाळांनी मला शिव्या द्यायला नकोत. त्यांना वर मजला चढवायला बांधकाम भक्कमच पाहिजे.’’

माधवराव आचवलांना पिढय़ान् पिढय़ा टिकणारं घर अभिप्रेत नव्हतंच. ‘‘तुम्ही आपल्या हयातीचं बघा. मुलांनी तुमचंच घर गोड करून घ्यावं, हा आग्रह कशाला? त्यांनी हे घर पाडून नवं बांधावं, विकून दुसऱ्या गावी घ्यावं, किंवा त्यांना वाटेल तसं करावं. आपण आज त्यांचा विचार करू नये.’’

बासष्ट साली घर पुरं झालं. खर्च बावन्न हजार झाला. घराला नाव पाहिजे. मी ते ‘अ क्ष र’ ठेवलं. अक्षरावर घर झालं होतं.

तेव्हा आसपास इमारतींची गर्दी झालेली नव्हती. बरंच रान मोकळं होतं. त्या पाश्र्वभूमीवर माधवरावांनी तयार केलेलं घराचं डिझाइन टुमदार आणि वेगळं दिसे. घर म्हणून त्याचं त्याला खास व्यक्तिमत्त्व होतं. केवळ आडवे उघडे वासे, मध्येच दिसणारा छपराचा भाग बघून काहीजण विचारीत, ‘याच्यावर पत्रे घालायचे राहिले काय?’

काहीजण सुचवीत : ‘‘निदान पारदर्शक पत्रे तरी घालून घ्या.’’

घरातही थोडं ऊन, वारा, पाऊस आला पाहिजे; बाहेरच्या वातावरणापासून आपण एखाद्या बंद पेटीत राहिल्यासारखं राहू नये, म्हणून अंगणवजा हा भाग उघडा होता. माधवरावांचं सांगणं होतं की, या Perforations ची खालच्या भिंतीवर चांगली छाया पडेल.’

आचवलांनी फर्निचर अद्याप सुचवलं नव्हतंच. आम्हीच सुचेल तसं घर सजवलं होतं. ते अनेकांना आवडलं.

सत्तर साली एन. एस. डी.चे अल्काझी एकवार घरी आले होते. ते म्हणाले, ‘‘मराठी लेखकाचं इतकं सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहतोय.’’

दोन हात झोपडी बांधू शकतात; मोठं घर बांधायचं तर अनेक हात लागतात.

सुरुवातीपासूनच माझ्या घराला लेखक, प्रकाशक, संपादक यांचा हातभार लाभला होता. घर पुरं झाल्यावर वास्तुशांती कवीच्या हातून झाली. होमहवन अण्णा-वहिनींनी केलं.

घर पुरं झाल्यावर एकवार आचवल पुण्याला आले. कागदावरचं घर प्रत्यक्षात उभं झालेलं बघून म्हणाले, ‘‘मी डिझाइन्स दिली, त्या सगळय़ा मित्रमंडळींपेक्षा तुम्ही घर पुष्कळच चांगलं करून घेतलं आहे.’’

हा अभिप्राय ऐकून मला बरं वाटलं.

घर नवं होतं तेव्हा आचवलांनी डिझाइन केलेलं हे घर बघायला वास्तुशिल्पशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी आवर्जून येत. नव्यानं घर बांधायला निघालेले काही हौशी लोकही येत.

या घरात माणसांप्रमाणं काही प्राणीही रमले. गुंडू बोका, जिम आणि काळूराम हे दोन कुत्रे, दगडू नावाचं कासव आणि दोन ससे- असा हा प्राणिसंभार होता.

तुमच्या जागेत झाडं नाहीत, छप्पर तापेल, आतून सीलिंग केलं पाहिजे- असं आचवलांनी सांगितलं होतं. खरं तर वासे उघडे बरे. फिरले, तर जाणवतात तरी. पण मी सीलिंग केलं आणि घरासमोर वृक्षराजीही वाढवली. आंबा, रामफळ, पेरू, मोसंबी, ग्रेपफ्रुट असली फळझाडं; कॅशिया, गुलमोहोर, प्राजक्त, रातराणी अशी फुलझाडं लावली. ती आता ताडमाड वाढली आहेत.

झाडं आणि घर यांचे संबंध फार जवळिकेचे झाले की संघर्षांला सुरुवात होते, असं माझ्या ध्यानी आलं आहे. घरं वनाच्या मुळांवर घाव घालतात आणि झाडं घराचं आसन डळमळीत करतात. वय झालं की वानप्रस्थाश्रमाकडं जावं, ही सूचनाच मुळं घराखाली पसरवून गृहस्थाश्रमी माणसाला वृक्ष देत असावेत.

..आता ‘अक्षर’च्या आजूबाजूचा परिसर पार बदलून गेला आहे. आधी रिकाम्या जागेवर भराभर घरं, बंगले उभे राहिले. शाल्मली, आंबा, निंब, जांभूळ असले वृक्ष तोडले गेले. आता बंगले, घरं पाडली जाऊन त्या जागी तीन मजली टोलेजंग अपार्टमेन्ट्स उभी राहिली आहेत. पायी चालावं अशा वाटा नाहीशा होऊन रस्ते झाले आहेत. त्यांच्यावरून भन्नाट वेगानं मोटारी, रिक्षा, स्कूटर्स, मोपेड्स धावताहेत. विलक्षण आवाज सतत होत आहेत. घरात बोलायचं तर व्यासपीठावरून बोलताना चढवावा एवढा आवाज चढवावा लागतो. मी घर बांधलं तेव्हा घरासमोर रस्ता नव्हताच; वाट होती. पावसाळय़ात या वाटेवर एवढा चिखल व्हायचा, की जड वाहनं रुतायची. आता समोरच्या रस्त्यानं सेकंदाला तीन वाहनं वेगानं जातात-येतात.

पंचवीस वर्षांमागंच काय, आजही माझ्यापाशी दूरदृष्टी आहे असं कोणी म्हणणार नाही. पण तेव्हा मी गावाबाहेर म्हणून ही जागा पसंत केली होती, हे खरं. आजूबाजूला पुष्कळ जमीन मोकळी होती. लेखक-प्रकाशक-संपादक मित्रांचा सहवास मिळावा म्हणून मी बऱ्याचजणांना सांगितलं- माझ्या आजूबाजूला छान मोकळे प्लॉट्स आहेत. तुम्ही घ्या. मला आता नवीन मित्र जोडता येणार नाहीत. माझ्या घराच्या आसपास ‘अरे-जारे’तला एखाद् दुसरा तरी मित्र पाहिजे.

तर सर्वाचा आक्षेप एकच : ‘फार एका बाजूला घर आहे तुझं. जवळपास दुकानं नाहीत. वाहन लवकर मिळत नाही. मंडई किती लांब तिथनं! बस नाही. नको बाबा, तिकडं.’

माझ्या शेजारी कोणीही आलं नाही.

तेव्हा गावाबाहेर वाटणारं माझं घर आता ऐन गर्दीच्या भागात आलं आहे.

(मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित.. ‘प्रवास एका लेखकाचा’मधून साभार)

बनगरवाडीचा लेखक – व्यंकटेश माडगुळकर – Marathisrushti Articles

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *