बेकरायण (Laurie baker)

बेकर यांचं जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तूंमधून व्यक्त होत राहिलं. हरित इमारत, पर्यावरणस्नेही बांधकाम, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्यानं काही घडलं असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. 

एकाग्रता, शांतता, चिंतन नष्ट करणाऱ्या या काळाला ‘लक्ष विचलित करणारा काळ’ (एज ऑफ डिस्ट्रॅक्शन) असं संबोधन लाभलं आहे. तात्कालिकतेची आस घेतलेल्या कला सर्वत्र नांदत आहेत. अशा क्षणिकतेच्या साम्राज्यात शांतता मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. सभोवतालचा गोंगाट, कर्कशता नष्ट करून मनाला उभारी देणाऱ्या स्पेसचा शोध प्रत्येक जण घेत आहे. अतीव द्रुत वेगाने धावणाऱ्या अशांत पर्वात मनाला शांत करणारा विलंबित स्वर शोधत आहे. सोहळे, मेळावे, मेजवान्या, सहली यांतून शांतता खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अरण्यात, पर्वतावर, समुद्राकाठी, थंड हवेच्या ठिकाणी जाऊनही एकांतवास लाभत नाही. आपल्याच घरामधली स्पेस काहीतरी खटकत राहते व ती अर्थपूर्ण वाटत नाही. म्हणून अंतर्गत सजावट वारंवार बदलून नावीन्य मिळवण्याचा ध्यास घेतला जातो. तरी आपल्या घरातच दूरचे पाहुणे असल्याचा त्रास होतच राहतो. स्वत:पासून आणि जगापासून तुटल्याची भावना कुरतडत राहते. ‘मी’पण निघून जावं, आपणच सर्वत्र भरून राहिलो असल्याची भावना व्हावी; परंतु अशी स्पेस निर्माण करणार कशी? अशा कठीण वेळी आपल्याला समृद्ध करतात बेकर, राय आणि कुमार!

आपण सर्वसाधारण माणसे मुलखाचे यांत्रिक असतो.‘पुन:पुन्हा तेच ते’मध्ये रममाण होतो. पुनरुक्तीत आनंद मानतो. नावीन्याची आस, ज्ञानाचा ध्यास नसतो. याचं मूळ कारण आपल्याला जिज्ञासा वा कुतूहल यत्किंचितही नसते. कुठलीही गोष्ट नव्याने करण्याचे धैर्य नसते. बेकर, राय आणि कुमार यांना अखेरपर्यंत नव्या गोष्टी जाणून घेण्याचे अपार कुतूहल होते.

निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या वास्तू

बेकर म्हणजे अमर्याद खुलेपणा! आयुष्य येईल तसं स्वीकारत जाऊन त्याला ते आकार देत गेले. आपण कल्पनाही करू शकत नाही, असे अतिशय मनस्वी आयुष्य लॉरी बेकर प्रत्येक टप्प्यावर निवडत गेले. इंग्लडच्या बर्मिंगहॅम शहरात वास्तुविशारद ही पदवी लॉरी बेकर यांनी 1937 मध्ये घेतली. त्या वर्षी फ्रँक लॉईड राइट यांची कॉफमन हाऊस (फॉलिंग वॉटर) ही वास्तू जगाचे लक्ष वेधून घेत होती. वॉल्टर ग्रोपियस यांनी पडदेवजा भिंतीसाठी काचेच्या वापराचा आरंभ केला होता.

सन 1942 मध्ये फ्रेंड्‌स ॲम्ब्युलन्स युनिटच्या पथकासोबत बेकर चीनकडे निघाले, त्या वेळी दुसरे महायुद्ध पेटले होते. युद्धसमाप्तीनंतर प्रचंड प्रमाणावर बांधकामे होणार होती. वास्तुविशारद व अभियंत्यांचा तुटवडा भासेल एवढी कामे निघण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. इंग्लंडकडे जाण्याकरता जहाज गाठण्यापूर्वी मुंबईत थांबावं लागलं, तेव्हा बेकर यांची गांधीजीशी भेट झाली. गोरा तरुण पाहून ‘चले जाव’च्या घोषणांचा आवाज आणखी वाढत असे. बेकर व गांधीजीचे सूर सहज जुळले आणि भेटी वाढत गेल्या. गांधीजी म्हणाले, ‘‘तुमची गरज इकडे अधिक आहे.’’ भारतात परत येऊन कुष्ठरोग्यांच्या वसाहतींची दुरुस्ती व नूतनीकरण करावे, असाच बेकर यांच्या मनाचा कल होता. गांधीजींमुळे तो निश्चय दृढ झाला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी बेकर यांना ‘करिअर’चा कसलाही मोह पडला नाही; उलट जीवाची जोखीम पत्करून ते थेट अंधारात उडी टाकून मोकळे झाले.

‘आयुष्य हा अज्ञाताचा प्रवास आहे, तर त्यात समोर येईल ते स्वीकारू’ ही त्यांची वृत्ती होती. भारतात कायमस्वरूपी येण्याचा निर्णय असो. वा मधुचंद्रासाठी हिमालयात गेल्यावर रस्ता, वीज नसणाऱ्या दुर्गम व पहाडी पिठोरागड भागात पंधरा वर्षे मुक्काम ठोकणे असो; हे येरा-गबाळ्याचे काम नाही. वयाच्या सेहेचाळिसाव्या वर्षापर्यंत त्यांनी वास्तुविशारद या करिअरचा अजिबात विचार केला नाही. त्या काळात ते केवळ त्यांच्या पत्नी डॉ.एलिझाबेथ यांच्या वैद्यकीय सेवेत  परिचारकासारखे सहकार्य करणे, मुलांचे संगोपन व गरज लागल्यास शेतकऱ्यांच्या घराची डागडुजी करणे यात मग्न होते. क्वचित कधी तरी कुष्ठरोग्यांच्या वसाहतींची कामे असत. कोणतीही भूमिका असो- ती मनोभावे करायचा स्वभाव असल्याने तक्रारीसारख्या नकारात्मक गुणांना थाराच नव्हता, तसेच उदात्तीकरणाला जागा नव्हती. काही कारणांनी पुढेही ते तिथेच राहिले असते, तर कदाचित त्यांना वास्तुनिर्मितीच्या संधीही मिळाल्या नसत्या.

कुमार गंधर्व व सत्यजित राय यांच्यासारखीच बेकर यांची कामगिरी उत्तुंग आहे. काव्य व संगीतानुभवाच्या पातळीवर वास्तूला नेण्याचे अजोड कार्य त्यांनी केले. फ्रँक लॉईड राइट यांनी पर्यावरणाशी संवाद साधणाऱ्या घररचनेची आस धरली, त्याबद्दल भरपूर लिहिले; परंतु बेकर यांनी सदैव पर्यावरणाशी तादात्म्य पावणाऱ्या रचना निर्माण केल्या. लोकगीत किंवा ओवी जशी साधी असते तशा बेकर यांच्या वास्तू कमालीच्या साध्या व अनाग्रही आहेत. ‘पंचक्रोशीतील सामग्रीतून गरजा भागवल्या पाहिजेत,’ हा गांधीजींचा सल्ला त्यांनी प्रमाण मानला होता. ‘‘देशाची पुनर्रचना कशी व्हावी याविषयी सातत्यानं मांडणी करणारे गांधीजी हे एकमेव नेते होते. पाश्चात्त्य विचार आणि वास्तुकलेचे संस्कार असल्यामुळे वयाच्या तिशीत मला त्यांचा सल्ला पचत नव्हता. परंतु वय आणि अनुभव वाढत गेले तसं गांधीजींचं द्रष्टेपण उमजत गेलं. हिमालय आणि केरळमधील आदिवासी भागात राहताना स्थानिक सामग्रीचा कल्पक उपयोग समजत गेला.’’ असं बेकर प्रांजळपणे म्हणत. स्थानिक सामग्रीचा सर्जनशील वापर हे त्यांचं वैशिष्ट्य झालं.

कुमार गंधर्वांनी लोकसंगीताची महत्ता समजावून सांगितली, तर बेकर यांनी स्थानिक वास्तुकलेचा सन्मान करून प्रचलित वास्तुकलेत तिला सामावून घेतलं. एकविसाव्या शतकात हरित इमारत हा सर्वत्र वापरला जाणारा मंत्र झाला. त्याचं प्रमाणीकरण सुरू झालं. या संकल्पना बेकर यांनी काळाच्या खूपच आधी अंगीकारल्या होत्या. ‘‘वीट तयार करण्यासाठी कसदार माती वापरू नका, मातीचा खालचा थर वापरा’’ असं ते कळकळीनं सांगत. दगड, वीट, कौलं, बांबू यांच्या अप्रतिम रचनेतून त्यांनी अभिजात वास्तू रचल्या. प्रत्येक टप्प्यावर अनावश्यक ते काढून टाकण्याचा त्यांचा अट्टहास होता. सभोवतालच्या निसर्गाला चुकूनही धक्का लावायचा नाही, याबाबत ते जागरूक होते.

थिरुअनंतपुरम येथील ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’च्या व्यवस्थापकीय संकुलाचे बांधकाम 1970 च्या सुमारास चालू होते. त्या वेळी तिथे एक बहावाचे (अमलताश- कॅशिया फिस्तुला) छोटे झाड होते. ते पाहून बेकर यांनी ऐनवेळी रचनेत सुधारणा केली. (‘देअर इज ऑलवेज सम रूम फॉर इम्प्रोव्हायझेशन’- सत्यजित राय) बहावाला धक्का न लावता त्याभोवती जिना देऊन इमारतच गोल करून टाकली. बहावा वाढला आणि वसंत ऋतूत त्याचा पिवळा धम्मक पसारा इमारतीची शोभा वाढवू लागला. वृक्षांचा आदर करावा तो बेकर यांनीच! वृक्षाला स्पर्श न करता त्याभोवती रिंगणासारखी इमारत रचणं याला अलौकिक प्रतिभा लागते. इमारतीची उंची नारळापेक्षा जास्त असू नये, वृक्षराजीत बांधकामे सहज लपून जावीत, याकडे त्यांचा कटाक्ष असे.

ऊर्जेचा कमीत कमी वापर व्हावा, याबाबत ते सदैव काटेकोर सजग होते. ‘‘घरात दिवसा दिवा लावावा लागत असेल तर वास्तुविशारदाचा उपयोगच काय?’’ असं ते विचारत. त्यांच्या वास्तूत पंखा लावण्याचीसुद्धा गरज क्वचितच पडते. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’ या भव्य संकुलात संगणक दाखल झाला व वातानुकूलतेची गरज भासली. तेव्हा बेकर यांनी नैसर्गिकरीत्या हवेचा झोत फिरणाऱ्या भिंतीचं आवरण तयार केलं. त्यांनी प्रत्येक रचनेत आरंभापासूनच पावसाचं पाणी साठवणाऱ्या हौदाची  सोय केली, शक्य तिथे विविध आकाराची तळी दिली. ‘ऊर्जा संकट’ ही चर्चा जोरात सुरू झाली, त्या वेळी त्यांनी बेकरशैलीत खिल्ली उडवली. ‘‘देशासमोर ऊर्जेचं संकट बिकट होत असूनही आपली बिनडोक उधळमाधळ चालूच राहते. ऊर्जेची बचत होऊ शकेल अशी बांधकामसामग्री आपण वापरत नाही. स्थानिक सामग्री उपलब्ध असूनही बेफाम वाहतूक करतो. असंख्य प्रकारचा उधळेपणा करत राहतो आणि खर्च भागत नसल्यानं जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अवाढव्य कर्ज घेतो. बदलत्या वास्तवाचं आम्हा वास्तुविशारदांना आणि नागरिकांना तरी कुठे भान आहे?’’ अशी बेकर यांची स्पष्टोक्ती असायची.

‘वास्तुकला म्हणजे गोठविलेले संगीत’ एका ज्येष्ठ वास्तुविशारदांनी ‘‘लॉरी बेकर हे कलावंत आहेत, आम्ही बापडे पोटभरू व्यावसायिक!’’ असं मार्मिक विवेचन केलं होतं. बांधकाम असो वा सार्वजनिक जीवन; त्यातील ओंगळपणा त्यांना सहन होत नसे. ‘‘सध्याचे घरबांधकाम व इमारती पाहून वास्तुकलेच्या प्रवासाबद्दल काय वाटतं?’’ असा प्रश्न विचारल्यावर, बेकर यांनी प्रतिप्रश्न केला- ‘‘व्यावसायिक वास्तुविशारदाला कलावंत म्हणता येईल का, असंही विचारता येईल. (‘विचार न करता कसरत करणाऱ्यांना गायक म्हणायचं का?’ असा सवाल कुमार गंधर्वदेखील विचारत.) वास्तुविशारदाच्या कल्पनांना ग्राहक आणि शहर नियोजन अधिकारी यांच्याकडून संमती मिळवत जावं लागतं. कागदावर काढलेल्या संकल्पनांना कला म्हणायचं ठरवलं तर अंतिम निर्मितीशी त्याचा संबंध काय उरतो, हे तपासावं लागेल. त्या कल्पनांचं ‘काँक्रीटीकरण’ करणाऱ्या कंत्राटदाराला त्यातली कला दिसत नाही; समजणं तर फारच दूर! असं म्हटलं तर, ‘कला म्हणजे काय?’ असं  कुणी विचारू शकेल. कला म्हणजे सौंदर्याची निर्मिती अशी व्याख्या शब्दकोशात आहे. ‘सौंदर्य म्हणजे काय?’ असा पुन्हा प्रश्न येईल. बघितल्यावर नजरेला बरी वाटावी अशी निर्मिती, असं कलेला म्हणणं मी पसंत करीन. सध्याचं बांधकाम, इमारती या कलेचा आविष्कार आहेत असं म्हणता येईल का, (अपवाद एखादे सतीश गुजराल!) असा प्रश्न मला पडतो.’’

‘वास्तुकला ही मूल्यांची अभिव्यक्ती असते,’ असं विख्यात वास्तुविशारद नॉर्मन फोस्टर म्हणत. बेकर यांची वास्तुकला हे त्यांच्या मानवतावादी विचारांचं प्रकटीकरण होतं. इंग्लिश, युरोपीय, पर्शियन, केरळी, बौद्धकालीन या सर्व वास्तुशैलींचा उत्कट मिलाफ त्यांच्या वास्तुकलेत आढळतो. काचेच्या खिडक्या, बाल्कनी यांतून खासगीपण आणि सार्वजनिकतेसाठी मोकळ्या जागा दिल्या. वसतिगृहातसुद्धा वैयक्तिकता जपण्याकरिता त्यांनी साधा आडोसा (लाकडी पार्टिशन) करून विश्रांतीसाठी जागा करून दिली. कोणता उद्देश कसा साध्य करावा, याची अप्रतिम प्रचिती त्यांच्या वास्तूंमधून येते.

कुमार म्हणत, ‘‘राग हे अरूप व अमूर्त असतात. राग म्हणजे आत्मा, बंदिश हे शरीर. वेगवेगळी शरीरं धारण केली की, एकाच रागाची असंख्य रूपे दिसायला लागतात.’’ बेकर यांनी साध्या व नेहमीच्या आकारांना अर्थ दिला. तऱ्हेतऱ्हेच्या आकारांशी खेळणे हा बेकर यांचा खास छंद होता. दोन स्वर नकळत एक होऊन जातात, तसे हे आकार एकमेकांत सहज मिसळून जायचे. त्यांनी केलेली त्रिमिती सघन आणि सेंद्रिय होऊन जाते. प्रकाश आणि हवा यांच्या संगमातून त्यांनी निर्माण केलेली स्पेस आल्हाददायी व सचेत होते. त्यांच्या वास्तूंमधून प्रकाशाला स्निग्धता आणि स्पेसला शांतपण प्राप्त होते. त्या वास्तूंमधील रंगछटा आणि गंध मनाला मोहवून टाकतात. या साऱ्या रचनेतून वातावरण बेहद्द प्रसन्न आणि डौलदार होऊन जाते. जोहान वॉन गटे यांच्या ‘वास्तुकला म्हणजे गोठविलेले संगीत’ या प्रतिपादनाची प्रचिती येते.

ही अनुभूती घेताना कुमार गंधर्वांच्या मालवबिहाग रागातील अवर्णनीय बंदिश (कुमाररचित) मनात घुमत राहते. कुमारांना वास्तुकलेत खास रुची होती. शिरीष पटेल यांच्यासारखे विद्वान वास्तुशिल्पी त्यांचे चाहते होते. कुमार मोठ्या आवडीने प्राचीन व समकालीन वास्तू पाहत. चित्र संग्रहालयाला भेट देत. सर्व क्षेत्रांत नवं काही झालं की, त्याची वार्ता त्यांना लागत असे आणि ते सवड काढून तिथे जात असत. पटेल यांनी कुमारांना चंडीगड दाखवले आणि त्याची महती वर्णन केली. कुमार मनोभावे पाहत राहिले. कार्बुझ्ये यांची प्रतिभा पाहून थक्क झालेल्या कुमारांनी स्वत:च्या अवस्थेबद्दल म्हटलंय,

‘ये सब खेल ज्ञानी महा धीर के

रूप बुलायो, छिपाग्यो, डरायो, मोहायो

सोचही-सोच सुधर सब बन्यो है

अंग निहारू, बहारू भीतरू देखायो’

बेकर यांची कुठलीही निर्मिती पाहताना आपली अवस्था अगदी अशीच होते.

वास्तुकलेतील अबोल क्रांती

केरळच नव्हे तर देशभर घरांच्या किमती अनाठायी महाग आहेत, हे बेकर जाणून होते. कंत्राटदार, विक्रेते, कारखाने यांचे संगनमत आणि राजकीय व्यवस्थेचा सक्रिय पाठिंबा, या अभद्र युतीमुळे शासकीय योजनांतील गृहप्रकल्प तसेच इतर बांधकामे अधिकाधिक खर्चिक करण्याचा खटाटोप चालू असतो, याची त्यांना स्पष्ट कल्पना होती. म्हणून त्यांनी अल्पखर्ची परंतु विलक्षण आकर्षक घरे जवळपास सहा दशके बांधून दाखवली. त्याच वेळी घराच्या किमती कशा कमी होऊ शकतात, त्यासाठी किती व कसे पर्याय आहेत, सार्वजनिक जीवनातील इमारतींच्या किमती कमी कशा करता येतील- हे सोदाहरण दाखवून देणाऱ्या अनेक पुस्तिका लिहिल्या.

सन 1962 मध्ये केरळ साहित्य शास्त्र परिषद (के.एस.एस.पी.)ची स्थापना झाली. ‘‘कला आणि विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. सामाजिक बदल घडविण्यासाठी तर प्रचलित कला व विज्ञान कुचकामी आहे.’’ हे समीकरण मोडून काढण्याचं कंकण घेतलेल्या परिषदेचं ‘सामाजिक क्रांतीसाठी विज्ञान’ हे घोषवाक्य होतं. विज्ञानाचे विरहस्यीकरण करण्याचे कार्य परिषदेने रुजवले. बालशिक्षण, पर्यावरण संरक्षण, साक्षरता, अल्पखर्ची बांधकाम, आरोग्यक्षेत्रातील परिषदेचं काम देशाचं लक्ष वेधून घेत होतं. साध्या आजारांसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, खेडेगावात ‘डॉक्टर नसेल तिथे’ उपचार कसे करावेत याच्या पुस्तिका निघत होत्या. व्यावसायिकांकडून होणाऱ्या फसवणुकीचा पंचनामा पहिल्यांदा करण्याचे तसेच अंधश्रद्धांमागील फोलपण चव्हाट्यावर आणण्याचे श्रेय केरळ साहित्य शास्त्र परिषदेकडे जाते. परिषदेच्या कामाशी बेकर सहजगत्या जोडले गेले. परिषद आणि पुढे ‘भारतीय  ज्ञानविज्ञान जथा’, ‘लोकविज्ञान’ यांसारख्या संस्थांमुळे त्यांच्या अनेक पुस्तिका व त्याचे अनेक भाषांमधील अनुवाद देशभर पोहोचले.

पुढे 1984 मध्ये केरळचे (माजी मुख्यमंत्री) अच्युतानंदन, ख्यातनाम अर्थतज्ज्ञ के.एन.राज आणि डॉ.चंद्रदत्त यांच्या समवेत बेकर यांनी ‘कॉस्टफोर्ड़ ’ (सेंटर फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंट) या विनानफा स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. बेकर यांनी 1987 मध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांकरिता केवळ 9200 रुपयांत घरे निर्माण केली. सन 1996 मध्ये केरळ सरकारनं गृहनिर्माण कार्यक्रमात लोकसहभाग घेण्याचे ठरवले, तेव्हा ‘कॉस्टफोर्ड’ने कळीची भूमिका पार पाडली. बेकर यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात बांधकामातील सामग्री व घरांचे नमुने दाखवणारी ‘निर्मिती केंद्रे’ तयार केली. (‘कॉस्टफोर्ड’ने आजवर 15000 अल्पखर्ची घरांची निर्मिती केली आहे.)

सत्यजित राय यांच्याप्रमाणेच बेकर यांनीही कधीही, कुठलंही तत्त्वज्ञान सांगितलं नाही. दोघेही त्यांच्या कलाकृतींमधून समर्थपणे व्यक्त होत राहिले. दोघेही सुस्पष्ट भूमिका घेताना कचरले नाहीत. कित्येक वेळा सखोल विचारातून आलेली भूमिका ही भावनांच्या आहारी जाणाऱ्या जनसामान्यांच्या लक्षात येत नाही. प्रस्थापित वर्गाच्या हातात असंख्य साधने असतात. त्यांचा उपयोग करून स्वत:च्या बाजूने मत घडविण्यात प्रस्थापित वाकबगार असतात. ‘अल्पखर्ची म्हणजे फालतू’, ‘दगड- विटांची घरं ही गरिबांची’ असे समज त्यातून रूढ व दृढ होत गेले. बेकर यांनी उर्मट, बेसूर व भेसूर बांधकामांची खिल्ली उडवली आणि श्रीमंतीचा दर्प असलेल्या वास्तूंना मूकपणे चपराक हाणली. बेकर यांची भूमिका ही जनतेच्या विरोधातील आहे, असा आभास सत्ताधारी, नोकरशहा व कंत्राटदार एकवटून कित्येक वेळा निर्माण करीत. राय यांनी असं राजकारण ‘गणशतु’ चित्रपटातून उलगडून दाखवलं आहे, अगदी तसेच बेकर ‘एकला चलो’ मार्गाने जात राहिले.

देशातील बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीकडे ते जागरूकतेने पाहत असत. वेळप्रसंगी व्याख्यान, लेख, वाचकांचे मनोगत वा व्यंगचित्रातून त्यांचे चिंतन व्यक्त होत असे. ‘‘बहुसंख्य जनता कशी जगते, हे बघण्याची आपली इच्छा नाही. आपण नियोजनकर्ते, बुद्धिवंत त्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करतो. तीन ते चार कोटींना घरं नाहीत, जागा आहे आणि सरकारनं तिचा वापर करून घेतला पाहिजे.’’

वास्तुकलेचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या संख्येत दर वर्षी वाढ होत असली तरी पन्नास वर्षांत अभ्यासक्रमात कल्पक बदल नाहीत, याबद्दल बेकरांचा सात्त्विक संताप व्यक्त व्हायचा. ‘‘बदलणारी सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन ते आव्हान पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे कार्य वास्तुकलेचं शिक्षण करीत आहे काय? वास्तुकलेच्या शिक्षणसंस्थांशी माझा थेट संबंध येत नाही. तिथं काय शिकवलं जातं, हे नेमकं माहीत नाही. परंतु झोपडपट्टीवासीयांना उत्तम घरं कशी देता येतील; कोट्यवधींना घरं, शाळा, रुग्णालयं बांधून देण्यासाठी काही दिशा, स्फूर्ती शिक्षणातून मिळतेय असं काही दिसत नाही.’’ (‘गायन विद्यालयांनी किती गायक निर्माण केले?’ असा प्रश्न कुमार गंधर्व विचारीत.)

मध्यमवर्गीयांची (आणि प्रस्थापितांची) गरिबांविषयी आणि झोपडपट्टीविषयी वाढती तुच्छता पाहून बेकर उद्विग्न होत असत. शहरातील अनेक उत्पादन आणि सेवा प्रक्रियांत (त्यामुळे अर्थव्यवस्थेत) सहभागी असणाऱ्यांविषयीचा अनुदार दृष्टिकोन व असहिष्णुता त्यांना सहन होत नसे. मध्यमवर्गीयांच्या आढ्यतेची आणि अभिजनवृत्तीची बेकर यथेच्छ टिंगल उडवीत. (राय यांच्या अखेरच्या चित्रपटांतून मध्यमवर्गीयांचा हा मूल्यऱ्हास स्पष्ट जाणवतो. महेश एलकुंचवार यांची ‘युगान्त’ ही नाट्यत्रयीही त्याच काळातील असून त्यातही हे ऱ्हासपर्व अधोरेखित होते.)

या विषयावर 1994 मध्ये दिल्ली येथे ‘शहरातील दारिद्र्य, मूलभूत सेवा आणि पर्यावरण’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे बीजभाषण करताना लॉरी बेकर म्हणाले होते, ‘‘दारिद्र्य हे आपल्या सार्वजनिक आयुष्याचे कडवट सत्य आहे. दारिद्र्य ही संकल्पना विपुलता, समृद्धीच्या विरुद्धअर्थी एवढीच नाही. दारिद्र्य केवळ साधनांपुरतेच नसते. हे लोक जगातील कित्येक सुखांपासून पूर्णपणे वंचित असतात. संधी व सुविधा, माहिती आणि ज्ञान, अनुभव आणि क्षमता, प्रेम आणि आपुलकी यांपासून ते दूर असतात. त्यांच्या दारिद्र्याला आपणच पूर्णपणे जबाबदार असतो. इमारतींसाठी भरपूर लाकूड लागते. मागणी वाढली तशी बेसुमार जंगलतोड होते. यामुळे आदिवासी विस्थापित होऊन भिकेला लागतात. त्यांना स्वाभिमानाने जगवण्याची, उद्योगी व स्वयंपूर्ण करण्याची निकड आपलीच असली पाहिजे. आता बोलण्यामध्ये वेळ न गमावता आणि फुकाचे नक्राश्रू न ढाळता एकत्र बसून प्रत्यक्ष कृतीला वाहून घेऊ या.’’

कचऱ्याच्या समस्येचा विषय निघाला की, बेकर म्हणत, ‘‘औदार्यासारखीच कचऱ्याचीदेखील सुरुवात घरापासूनच होते (रबिश लाइक चॅरिटी बिगिन्स ॲट होम). कचरा हे वास्तव नसून ती एक विचित्र मानसिकता आहे. मुळात टाकाऊ ही संकल्पनाच तपासली पाहिजे. काहीही विचार न करता आपण बेपर्वाईने वापर करून प्रचंड घाण तयार करीत आहोत. समस्यांची मालिका आपणच तयार करतो. उदाहरणादाखल आपण सफरचंद घेऊ. बहुसंख्य लोक सफरचंदाचा थोडा भाग खाऊन अधिकांश टाकून देतात. साल काढून टाकतात, मधला गाभा फेकून देतात. सालीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. पुढच्या सफरचंदाला जन्म देणारा गाभा किती सकस असतो! पण आपल्या डोक्यात हे येतच नाही. अगदीच निरुपयोगी खूप कमी असतं. उपयोगिता जाणून न घेतल्याने आपली टाकाऊ वृत्ती जोपासली जाते. त्याचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने उपयोग करता येतो. म्हणून ‘निरुपयोगी’ ही संज्ञाच टाकून दिली पाहिजे. टाकाऊऐवजी ‘उपउत्पादन (बाय प्रॉडक्ट)’ म्हणून पाहता आलं तर फेकून देणे, जाळणे, पुरणे अतिशय कमी होऊन जाईल.’’ असा त्यांचा आग्रह होता.

‘‘कचरा हे शहराचे व्यवच्छेदक लक्षण झाले आहे. कोणत्याही शहराला कचऱ्याची विल्हेवाट लावणं शक्य होत नाही. आपण दर तासाला अमाप घाण ओतत असतो. ही नासाडी उपयोगात आणता येते. कागद, कापड, धातूचे तुकडे, प्लॅस्टिक गोळा करून त्यांचा पुनर्वापर वा पुनरुत्पादनासाठी (रिसायकलिंग) उपयोग करता येतो. ओल्या कचऱ्यापासून उत्तम सेंद्रिय खत होऊ शकते. टाकाऊ वस्तू एकत्र करून कल्पकतेने झकास डिझाईन केल्यास किती तरी सुंदर वस्तूंची निर्मिती करता येईल. पाणी स्वच्छ करून त्यात मासे सोडता येतील.’’ कुठल्याही शहरातील गरिबांना व स्थलांतरितांना गलिच्छ पर्यावरण सहन करावं लागतं.

गावाच्या मानाने शहरात रोजगार अधिक मिळतो. अनेक संधी उपलब्ध होतात. रस्ते, वाहतुकीची सोय, वीज, शाळा, दवाखाना या सुविधा चांगल्या असतात. पाणी वा जळण आणण्याकरिता खूप लांबवर पायपीट करावी लागत नाही. त्यामुळे एकंदरीत शहरी जीवन सुखकारक वाटू लागतं. परंतु, ते भासतं तितकं झकास जग नसतं. गावापेक्षा शहरात अन्नधान्य महाग असते. रोजगार वर्षभर असेलच असे नाही. कंत्राटी मजुरांचे भीषण शोषण होते. घाण व कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधील झोपडपट्टी म्हणजे नरकयातनाच! पाणी व संडास ही सर्वांत भयंकर समस्या असते. हवा, पाणी, ध्वनी इत्यादी सर्व प्रकारचे प्रदूषण अंगावर घेत जगावं लागतं. गरीब जनता ही पर्यावरणीय निर्वासितांचं आयुष्य जगते. वस्तुत:, हे मजूर शहरातील अनेक उत्पादन व सेवाक्षेत्रात काम करीत असतात. त्यांचा अर्थव्यवस्थेला आणि शहरी जीवनाला मोठा हातभार लागतो. हे जाणून ‘‘कुठल्याही शहराची झोपडपट्टी हटवून पुनरुत्पादक वसाहत होऊ शकते. माझ्या कल्पनेतील झोपडपट्टी ही क्रीडांगणासारख्या आकाराचं छोटं गाव असेल. घराखाली दुकान, गोदाम, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, शाळा, रुग्णालय, वाचनालय, सभागृह यासाठी सोय असेल. जनावरांसाठी गोठे व बायो-गॅस संयंत्र असतील. अशी वसाहत शहराच्या मध्यवर्ती भागात असणे हे सर्वांच्या सोईचे व अल्प वाहतुकीचे असेल.’’ अशी संकल्पना बेकर यांनी मांडली होती.

झोपडपट्टी निर्मूलन करून उत्तम वसाहत करावी, हे त्यांचे अखेरचे स्वप्न होते. त्यांच्या पश्चात 2013 मध्ये थिरुअनंतपुरमच्या करीमदोम कॉलनीत ‘कॉस्टफोर्ड’ या संस्थेने बेकरप्रणीत वसाहत वास्तवात उतरवली. 16 कोटींचा निधी लागलेल्या, 10 एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात 28 गटांत 560 सदनिका बांधल्या गेल्या. बेकर यांच्या इच्छेप्रमाणे ‘कॉस्टफोर्ड’ने सर्वेक्षण करून सर्व  प्रकारच्या सोर्इंनी युक्त केलेल्या या वसाहतीत बेघर, रोजंदारी कामगार यांची प्राधान्याने निवड केली.

शहरांवर झालेल्या मोटारींच्या आक्रमणाविषयी बेकर यांना चीड येत असे. मोकळ्या जागा नष्ट करीत वाढणाऱ्या इमारती पाहून त्यांना त्रास होत असे. ‘‘पादचारी, दुचाकीस्वारांचा अपमान करणारी अमानुष शहरे सर्वांसाठीच घातक ठरतील.’’ असं ते म्हणत. जगद्‌विख्यात शहररचनाकार यान गेल यांनी ‘सिटीज फॉर पीपल’ या पुस्तकात ‘असे’ शहरीकरण गैरव्यवस्थापनाचे बळी ठरेल, असं म्हटलं आहे. (या पुस्तकाचा मराठी अनुवाद वास्तुविशारद सुलक्षणा महाजन यांनी ‘असावी शहरे आपुली छान’ या नावाने केला आहे.)

बेकर : एक दंतकथा!

बेकर यांचा पिंडच विरळा होता. त्यांनी स्वत:ला कधीही, कुणावर लादले नाही. कुठले तत्त्व मांडतोय, असा आविर्भाव नाही. (त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचे ठरवल्यानंतर प्रस्तुत लेखकाला त्यांनी दोन वर्षे वेळ दिला   नाही. सहसा अगदी उलट अनुभव येतो. ‘लिहा’ म्हणून मागे लागणारे पावलोपावली भेटतात) स्वत:बद्दल ते फारसे बोलत नसत. विचारले गेलेच, तर बोलताना अभिनिवेशाचा लवलेश नाही. केवळ सकारात्मकतेने ते ओतप्रोत भरलेले होते. जे.कृष्णमूर्तींना अभिप्रेत, पूर्वग्रह न ठेवता घटना व व्यक्तींकडे पाहण्याची स्वच्छ व निकोप नजर त्यांना लाभली होती. कुठल्याही अवघड वा गंभीर प्रसंगी निरोगी हास्य निर्माण करणाऱ्या सूक्ष्म विनोदबुद्धीची जोड लाभल्याने बेकर हे व्यक्तिमत्त्व प्रसन्नच राहत आले.

सन 1948 मध्ये बेकर भारतात कायमस्वरूपी वास्तव्याकरता आले. त्या वेळी भारत नुकताच स्वतंत्र झालेला अष्टदरिद्री देश होता. ‘लोकशाहीस लायक नाही,’ ‘यादवी माजून असंख्य शकले होतील’, ‘भारत म्हणजे अनागोंदी ’ अशी भारताची वर्णने इंग्लंडमधील पंडित करीत होते. तरीही बेकर यांनी हा निर्णय का व कसा घेतला याबद्दल ते कधीही, काहीही बोलले नाहीत. त्यांना इंग्लंडचे कसलेही आकर्षण नव्हते. भारतवासी झाल्यानंतर ते केवळ एकदाच 1981 मध्ये रॉयल युनिव्हर्सिटीचा सन्मान  स्वीकारण्याकरिता इंग्लंडला गेले. त्यांनी चीनमध्ये सैनिकांची शुश्रूषा करून हिंसा व रक्तपाताचा तिरस्कार व्यक्त केला. गरीब देशांचा छळ आणि लूट केलेल्या गोऱ्यांची त्यांना घृणा वाटत असे. त्यांचा धिक्कार करण्यासाठी बेकर यांनी दरिद्रीनारायणांमध्ये सामील होऊन त्यांच्या सेवेत आयुष्य घालवलं. निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी आयुष्य पणाला लावलं. सभोवतालच्या परिस्थितीचा त्यांना संताप जरूर येत असे, परंतु तो व्यक्त करण्याची त्यांची रीत सर्जनशील आणि अतिशय सकारात्मक होती. अशी अभिव्यक्ती केवळ तत्त्वज्ञान जगणारे श्रेष्ठ कलावंतच करू शकतात. (ते भौतिक अर्थाने आपल्यामध्ये असले तरी ते आपल्यासारखे नसतात.)

बेकर भारतात केवळ सर्व काही देण्याकरताच आले आणि ‘जे- जे उत्तम, उदात्त, उन्नत ते-ते’ देत गेले. वार्धक्यामुळे शरीर थकलं तरी मन अजूनही टवटवीतच होतं. थोडं बरं असलं तरी ‘मला माझ्याच हातचं आवडतं’ ही सबब पुढे करीत ते स्वत: स्वयंपाक करत. ‘मला रुग्णालयात ठेवू नका’ अशी त्यांची सक्त ताकीद होती. त्यांचा घनपदार्थांचा आहार हळूहळू बंद होत गेला. एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे ते मृत्यूला अतिशय शांत मनाने सामोरे गेले! भारतात आल्यापासून 59 वर्षांनंतर 1 एप्रिल 2007 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी जगाला अखेरचा रामराम केला.

दंतकथा भासावी असं आयुष्य बेकर जगले आणि त्यांच्या हयातीतच ते एक दंतकथा होऊन गेले. बेकर, राय आणि कुमार या तिघांनाही एकमेकांच्या कार्याचा आदर होता; परंतु त्यांची कधी भेट झाल्याचा उल्लेख मिळत नाही. बेकर यांच्या वास्तूमध्ये कुमारांचे गायन झाले असते आणि ते राय यांच्या नजरेने टिपून दाखवले असते, तर या त्रिकुटांच्या संमेलनातून एक त्रिकालाबाधित व अद्वितीय कलाकृती निर्माण झाली असती.

सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारे बेकर यांचा उपयोग भारताने किती व कसा करून घेतला; कसा घेता आला असता, असे प्रश्न त्रासदायक आहेत. आपल्या देशातील अर्थ-राजकारणाच्या प्राधान्यता त्यातून स्पष्ट दिसतात. आपल्याला देशभर बेकरप्रणीत हरित इमारती व वसाहती दिसू शकल्या असत्या. (जगातील हरित शहरांत भारतातील एकाही शहराचा समावेश नाही) कित्येक संस्थांची नमुनेदार संकुले उभी राहिली असती. महाराष्ट्राने 1993 च्या किल्लारी भूकंपानंतर त्यांच्याकडून पुनर्वसन केलं असतं, तर ते आदर्श ठरलं असतं. बेकर हे राष्ट्राचे भूषण होते. त्यांना नाकारून त्यांचं वैयक्तिक नुकसान काहीच झालं नाही; समाजाची व राष्ट्राची मात्र कधीही भरून न निघणारी हानी झाली.

बेकर यांचं जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तूंमधून व्यक्त होत राहिलं. हरित इमारत, पर्यावरणस्नेही बांधकाम, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्यानं काही घडलं असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. साधारणपणे 1990 च्या दशकापासून अनेक तरुण भारतीय वास्तुकलेचा अभ्यास नव्याने करू लागले आहेत. या विद्यार्थ्यांकरता बेकर हे आदर्शवत्‌ नायक आहेत. बेकर यांच्या कार्यातून स्फूर्ती घेणारे असंख्य तरुण आहेत. त्यांची वास्तुकला आजही समकालीन वाटते. या तरुणांनी प्रचलित खर्चिक, ऊर्जाग्राही वास्तूंच्या विरोधात मोहीम उघडून पर्यावरणसंवादी रचनांचा प्रसार केला, तर आपली वैयक्तिक व सामाजिक स्पेस अर्थपूर्ण होऊ शकेल. 

(2 मार्च 2016 पासून लॉरी बेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, त्यानिमित्ताने हा लेख लिहिला आहे.)

– अतुल देऊळगावकर,  लातूर

atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *