दोन हजारांची वस्ती चाळीस हजार पुस्तकं….

सू हेलपर्न न्यू यॉर्क राज्यातल्या एका डोंगरी खेड्यात रहायला गेल्या.  गाव आकारानं मोठं होतं पण माणसं होती फक्त २ हजार. २ हजार माणसं २ हजार चौरस मैलाच्या परिसरात पसरलेली. डोंगराळ वस्त्या अशाच असतात. एक डोंगर, खूप अंतरावर दुसरा डोंगर, मधे घळ. डोंगरावर किवा घळीत एकादं घर. दुसरं घर दिसतही नाही इतक्या अंतरावर.

एकोणिसाव्या शतकात या गावात चामडी कमावण्याचे उद्योग होते, लाकूड कारखाने होते. गावात रोजगार मिळालाच तर मोसमी स्वरुपाचा असे. औद्योगीक अमेरिका श्रीमंत झाली पण दूरवर असलेल्या खेड्यांची स्थिती मात्र आर्थिक दृष्ट्या सुधारली नाहीत. आजही कित्येक खेड्यांत मोडळीला आलेल्या घरात लोकं रहाताना दिसतात.

सू लेखिका आहेत, त्यांनी ऑक्सफर्डमधे डॉक्टरेट केलीय, त्या लेख लिहितात, पुस्तकं लिहितात, कॉलेजात शिकवतात. शहराच्या वर्दळीपासून दूर जाऊन लेखन करावं यासाठी त्या डोंगराळ गावात गेल्या.

गावात ग्रंथालय नव्हतं. पूर्वी एक ग्रंथालय होतं आणि विभागीय ग्रंथालयातून तिथं बसनं पुस्तकं येत. काही काळानं काही पुस्तकं परत जात, त्या जागी काही पुस्तकं नव्यानं येत. पण गावातल्या लोकांनी लक्ष न दिल्यानं ती व्यवस्था कोलमडली आणि गावात पुस्तकं येईनाशी झाली.

हेलपर्नचं पुस्तकांशिवाय चालणारच नव्हतं. त्यांनी खटपट सुरु केली. ग्रामपंचायतीशी चर्चा केली. घरटी १० डॉलर वर्गणी गोळा करून ग्रंथालय सुरु करायचं ठरलं. गावातले काही लोकं म्हणाले, पुस्तकांशिवाय चाललंय ना, मग ठीक आहे, तसंच चालू द्या. काही लोक म्हणाले पुस्तकांची गरजच कुणाला आहे? एक माणूस तर म्हणाला की ग्रंथालयं कम्युनिष्ट असतात. अमेरिकेत कम्युनिझम, समाजवाद हे शब्द शिव्यांसारखे वापरले जातात, जणू ते पाप किंवा देशद्रोहच. बॉस्टनमधे खूप ग्रंथालयं आहेत, तिथं माणसं खूप वाचतात, अभ्यास करतात म्हणून प्रे.निक्सन तर म्हणत की बोस्टन म्हणजे सोवियेत युनियन आहे.

लोक वर्गणी द्यायला तयार नव्हते. हेलपर्ननी आयडिया काढली. ग्रामपंचायतीच्या बजेटात इथून तिथून १५ हजार डॉलर बाजूला काढणं शक्य होतं. त्यातून एक तीन हजार पुस्तकं विभागीय ग्रंथालयातून ग्राम पंचायतीनं घेतली. ग्रंथालयाचे दोन प्रकार असतात. एका ठिकाणी पुस्तकं तिथं बसून वाचायची असतात, म्हणजे ते वाचनालय असतं. दुसऱ्या प्रकारात पुस्तकं काही तरी फी आकारून घरी न्यायला दिली जातात.ते असतं देवघेव ग्रंथालय. कित्येक ग्रंथालयात कोणतीही फी न घेताही कितीही पुस्तकं घरी नेता येतात. अभ्यास करणारी माणसं दुरून येतात, त्या शहरात रहात नसतात. त्यांना दररोज वाचनालयात येणं शक्य नसतं. अशा लोकांना पुस्तकं घरी न्यायला दिली जातात. तर घरी पुस्तकं नेता येतील अशी तरतूद ग्रंथालयात करण्यात आली. ग्रंथालय देवघेव ग्रंथालय झालं. विभागीय वाचनालयानं सांगितलं की पाचशे व्यक्तीसाठी कार्डं छापून घ्या, तेवढं सुरवातीला पुरेसं आहे.

टाऊन हॉलच्या मागे असलेल्या एका अडगळीसारख्या खोलीत पुस्तकं ठेवण्यात आली. दोन निवृत्त शिक्षक आणि एक हौशी ग्रंथपाल व्यवस्था पाहू लागले.

हौशी ग्रंथपाल हे मजेशीर प्रकरण होतं. या ग्रंथपालांचं एक जुन्या पुस्तकांचं दुकान होतं. अमेरिकेत शाळेत गोष्टींचा तास असतो. म्हणजे शिक्षकानं गोष्टी सांगायच्या किवा विद्यार्थ्यानं गोष्टी वाचायच्या. गावातल्या पोरांना वाचण्यासाठी काही नव्हतं. विशेषतः रस्त्यावर बिगारी कामं करणारे, झाडं तोडणारे इत्यादी लोकांना प्रश्न असे की मुलांना गोष्टी कसल्या सांगायच्या, त्याना वाचायला काय द्यायचं. तर अशी माणसं गोष्टीच्या तासात मुलांना जुन्या पुस्तकांच्या दुकानात आणायची. दुकानदार त्यांना कथा कादंबऱ्या द्यायचा. त्या मुलांच्या नादानं मोठी माणसंही कादंबऱ्या वाचू लागली, स्वतंत्रपणे कादंबऱ्या घेऊ लागली. त्यामुळं या दुकानदाराला कोणाला काय आवडतं ते कळलं होतं, पुस्तकं घेऊन जाणाऱ्यांना कसं सांभाळायचं तेही त्याला कळलं होतं. हेलपर्ननी त्याला ग्रंथपाल केलं.

हेलपर्ननी पुस्तकं घरी नेण्याला फी ठेवली नाही. वाचनालयात बसा नाही तर घरी न्या, फी नाही. मुलं आणि त्यांच्या पालकांचा विश्वासच बसेना की पुस्तकं फुकट वाचायला मिळतात. काऊंटरवर मुलं आणि पालकांची ही गर्दी होऊ लागली, रांगा लागल्या. लोकांना पुस्तकांचा नाद लागला. वर्षाच्या शेवटी १५०० व्यक्तीनी ग्रंथालयाला देणग्या दिल्या.

गावात बुक क्लब सुरु झाला. वाचणारे लोक एकत्र येऊन पुस्तकावर चर्चा करू लागले. शाळेत जाण्याच्या वयाच्या नसलेल्या मुलांसाठी गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम ग्रंथालयात सुरु झाला. तिथंच नाट्य वाचन सुरु झालं. ज्यांच्या घरी इंटरनेटची सोय नव्हती अशी मुलं ग्रंथालयात अभ्यासासाठी बसू लागली. ग्रंथालयं कम्युनिष्ट असतात असं म्हणणारा माणूसही एके रविवारी ग्रंथालयात पुस्तकं घेताना दिसला.

आता त्या देवघेव ग्रंथालयात ४० हजार पुस्तकं आहेत.

सार्वजनिक ग्रंथालय हा अमेरिकन समाजजीवनाचा, अमेरिकन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ग्रंथालय हा लोकशाहीचा कणा आहे असं अमेरिकेत मानलं जातं. तिथं समाजातल्या सर्व थरातली, सर्व संस्कृतींची, सर्व वंशाची माणसं एकत्र येतात, ज्ञान आणि माहितीची देवाण घेवाण करतात.

कार्नेजीनी सार्वजनिक ग्रंथालयांना प्रचंड म्हणजे प्रचंड पैसा दिला. पण कार्नेजी काहीही फुकट देण्याच्या विरोधात होते. करोडो डॉलर ग्रंथालयाला दिले तरी गावातल्या लोकांनी जमीन आणि इतर गोष्टी ग्रंथालयाला दिल्या पाहिजेत असं त्यांचं मत होतं. आश्रय दाता मदत करत असला तरी ग्रंथालयाच्या दैनंदिन खर्चासाठी त्याच्याकडं जायला कार्नेजींचा विरोध होता. ग्रंथालयाच्या खर्चाच्या १० टक्के भार गावातल्या लोकांनी उचलला पाहिेजे अशी त्याची अट होती. पुस्तकाच्या देवघेवीसाठी ते नाममात्र कां होईना पण फी आकारत असत. कार्नेजींनी आजच्या किमतीत १.६ अब्ज डॉलर देऊन अमेरिकेत १६७९ आणि जगात २५०९ वाचनालयं उभी केली.

आज अमेरिकेत १६,५६८ सार्वजनीक मोफत वाचनालयं आहेत. हेलपर्न बाईनी जसं त्यांचं ग्रंथालय उभारलं तशीच अमेरिकेतली सार्वजनिक  ग्रंथालयं निर्माण झाली आहेत.

प्यू रीसर्चनं २०१६ केलेल्या पाहणीत ९० टक्के नागरिकांनी पुस्तकं आपल्याला खूप किवा काही प्रमाणात महत्वाची वाटतात असं सांगितलं.  चाचणीत भाग घेतलेल्या १६ आणि त्यापेक्षा अधीक वयाच्या नागरिकांपैकी अर्ध्यांनी गेल्या वर्षी किमान एकदा तरी सार्वजनीक ग्रंथालयाला भेट दिली होती.

– निळू दामले https://www.niludamle.com/

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *