Description
पूज्य स्वामी रामानंदतीर्थ हे महान योगी पुरूष होते.नुसते ते योगी नव्हते, तर एक थोर राजकारणी होते.
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती” या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ते श्रेष्ठ संतही होते. हैदराबाद संस्थानातील निजामाच्या एकतंत्री जुलुमी राजवटीमुळे व रझाकारांनी चालविलेल्या अनिर्बंध अत्याचार, हिसाचारांदी दहशतवादी कृत्यांमुळे संस्थानातील जनता त्रस्त झाली होती. अशा वेळी पूज्य स्वामी रामानंदतीर्थांनी जनतेचे नेतृत्व करून हैदराबाद मुक्ति संग्रामाचे रणशिंग फुंकले. जनतेने प्रचंड आंदोलन उभे केले. लढा यशस्वी झाला. हैदराबाद संस्थान हिंदी संघराज्यात विलीन झाले. संस्थानात लोकशाही राजवट आली. अशा रीतीने पू. स्वामीजी हैदराबाद मुक्ति संग्रामाचे सरसेनानी म्हणून प्रसिद्ध झाले. पण मूळात ते विरक्त व खरे संन्यासी होते. नंदवंशाची व तेथील अमात्य आर्य चाणक्य यांची कथा सर्व परिचित आहे. नंदकुळाचा निःपात करून मगधभूमीला मुक्त करण्याची प्रतिज्ञा चाणक्याने खरी करून दाखविली. पण तो शेवटपर्यंत झोपडीतच राहिला. तसेच पू. स्वामी रामानंदतीर्थ यांनी आपली राजकीय भूमिका अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देत मोठ्या धैर्याने पार पाडली. पण थोड्याच दिवसात त्यांनी विरक्ती स्वीकारली. राजकारणातून निवृत्त होऊन ते शांति आश्रमात राहायला गेले.
निवेदन
मराठवाड्याचे स्वातंत्र्यसेनानी : स्वामी रामानंदतीर्थ
आज महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असलेल्या मराठवाड्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात कित्येक वर्षे निजामी राजवट होती. ही राजवट धर्मांध, जुलमी व अत्याचारी होती. बहुसंख्य प्रजा हिदू असली तरी त्यांना ना धर्मस्वातंत्र्य होते, ना विचारस्वातंत्र्य होते. अस्मिता हा शब्द या राजवटीत मोडीत निघालेला होता. विशेषतः रझाकारांच्या काळात प्रजा या अन्यायाला, अत्याचाराला वैतागलेली होती. या राजवटीतप्रजेची उर्मी, प्रजेचा हुंकार दबला-दाबलेला होता. या दबल्या-दाबलेल्या उर्मीला, हुंकाराला मुक्तरूप देण्याचे काम मराठवाड्यातल्या ज्या महनीय व्यक्तींनी केले, त्यामध्ये स्वामी रामानंदतीर्थ हे अग्रभागी होते.
स्वामीजींनी लिहिलेल्या या रोजनिश्रीतून त्यांच्या विकसित होत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन जसे आपल्याला होते त्याप्रमाणेच मराठवाड्याच्या स्वातंत्र्यळढ्याची साद्यंत माहिती या रोजनिशीतून मिळते. या दृष्टीने स्वामीजींच्या या रोजनिशीचे विशेष महत्त्व आहे.
स्वामीजींचे शिष्य अमृतराव देशमुख यांनी ही रोजनिशी जिज्ञासू वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच श्री. वि. पां. देऊळगांवकर यांनी या रोजनिश्लीवर आवड्यक ते संस्कार करून ती प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला दिल्याबद्दल मंडळ या उभयतांचे आभारी आहे.
रा. रं. बोराडे,
अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
दिनांक ८ ऑगस्ट २००१.
Reviews
There are no reviews yet.