Description
प्रस्तावना
आपल्या देशात खऱ्या इतिहासाची किती उणीव आहे हे सांगावयास नको. पाश्चात्त्यांनी लिहिलेले इतिहास सर्वांशी चांगले व मनाचे समाधान होण्याजोगे नाहीत, असे म्हटल्यावाचनू राहवत नाही. याचे कारण एक तर त्या लोकास आपल्या देशस्थितीची पूर्ण माहिती होणे कठीण आहे व दुसरे असे की, जितके इंग्रजी ग्रंथकारांनी इतिहास लिहिले आहेत तितके साहजिकच एकपक्षी झाले आहेत. सारांश, हिंदू लोकांच्या दृष्टीने हिंदुस्थानच्या इतिहासाची उणीव कोणीतरी हिंदू इतिहासकार निपजल्यावाचून दूर व्हावयाची नाही हे निर्विवाद आहे. असा बुद्धिमान, व्यासंगी व अधिकारी पुरुष केव्हा निपजेल तो निपजो. परंतु आपल्या हाती असणारी इतिहासाची साधने जमा करून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे व त्याप्रमाणे अनेक लोकांनी छापलेल्या ग्रंथांतून अशी माहिती आजवर उपलब्ध झाली आहे, हे आपल्यास भूषण मानण्याजोगे आहे.
सन 1857 सालचे बंडाचे जे इंग्रजी इतिहास झाले आहेत ते वरील प्रकारचे आहेत. के. मालिसन वगैरे इतिहासकारांनी जे मोठाले इतिहास लिहून ठेवले आहेत, ते सर्व एकपक्षी आहेत. त्यात बंड इंग्रजांच्या कोणत्या चुकीमुळे उद्भवले, साहेब लोक ठिकठिकाणी कसे मारले गेले, थोड्या लोकांनी मोठ्या शौर्याने आपले प्राण कसे वाचविले, व पुढे इंग्रजांनी दिल्ली, लखनौ, कानपूर वगैरे शहरे कशी हस्तगत केली, इत्यादि हकिकती सविस्तर रीतीने वर्णन केल्या आहेत. परंतु बंडापूर्वी हिंदू लोकांच्या समजुती काय झाल्या होत्या; नानासाहेब, झाशीवाली, लखनौची बेगम इत्यादि लोकांनी बंडाकरिता काय उद्योग केले; ते आपले ठिकाणी कसे वागत होते; त्यांस पुढे दु:खे कोणती व काय कारणाने भोगावी लागली; अक्कल, धैर्य, शौर्य, क्रूरपणा, मूर्खपणा इत्यादि निरनिराळे गुण त्यांच्या ठिकाणी कसे दिसून आले व रयतेस बंडाच्या दिवसांत किती संकटे भोगावी लागली, याजविषयी त्यांच्या ग्रंथांतून कोठेच वर्णन नाहीत. हे साहजिक आहे की, याजविषयी त्यास माहिती नसावी व असली तर क्वचित् प्रसंगी पायोनियरसारख्या पत्रात ‘The Tiger Instinct of Imperial race चिथवू नका नाहीतर आम्ही १८५७ सालाप्रमाणे Fire and sword चालवूं’ असे उद्गार निघतात; तथापि वरील गोष्टीचे वर्णन आपल्या ग्रंथात करणे त्यास योग्य वाटत नाही. अशा स्थितीत या अशा गोष्टींविषयी आपल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहून लिहिलेल्या हकिकतीच उपयोगी पडणार आहेत. प्रत्यक्ष पाहून किंवा विश्वसनीय लोकांपासून ऐकून सविस्तर लिहून ठेवलेली त्या त्या वेळची हकिकत हे एक भावी इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. सन 1857 सालासंबंधेच कित्येक साहेब लोकांनी आपआपल्या हकिकती किती मनोवेधक रीतीने लिहिल्या आहेत व त्या के. मालिसन इत्यादी इतिहासकारांस कशा उपयोगी पडल्या आहेत, हे इंग्रजी वाचकास ठाऊकच आहे. अशा प्रकारची एक हकिकत एका विद्वान भिक्षुक प्रेक्षकाने लिहून ठेवली आहे, ती भावी इतिहासकारास उपयोगी पडेल अशा हेतूने या पुस्तकात मी वाचकांपुढे मी ठेवीत आहे.
सदरहू प्रेक्षक(लेखक) मूळचा भिक्षुक असून तो हिंदुस्थानात बंडाचे दिवसांत द्रव्यार्जनाकरिता गेला होता. त्याची स्मरणशक्ती चांगली असल्याने व त्यास मजकूर खुबीदार रीतीने जुळवून लिहिण्याची शैली साहजिक साध्य असल्यामुळे, भिक्षुक असतानाही त्याने लिहून ठेवलेली हकिकत छापण्यासारखी आहे असे मला वाटते. बिठूर, ग्वालेर वगैरे ठिकाणच्या हकिकतीशिवाय बाकी पुस्तकात लिहिलेल्या बहुतेक गोष्टी ग्रंथकाराने पाहिलेल्या आहेत. नानासाहेबांची हकिकत व ग्वालेरची हकिकत, ग्रंथकाराने ऐकिली असून ती जरी इतर हकिकतीपेक्षा कमी किमतीची आहे तरी, ती त्या वेळेस ग्वालेरीस व ब्रह्मावर्तास चांगल्या माहीतगार लोकांकडून ऐकलेली असून बरीच विश्वसनीय आहे.
या पुस्तकात इंग्रज लोकांनी लिहिलेल्या हकिकतीप्रमाणे किती मनोरंजक रीतीने हकिकत सांगितली आहे, याविषयी वाचक कल्पना करतील. परंतु मला इतके सांगितले पाहिजे की, मूळ ग्रंथात मी फार थोडा बदल केला आहे. कोठे कोठे भाषा सुधारली असून अलीकडच्या रीतीने लिहिली आहे व काही ठिकाणी मजकूर अधिक वाटला तो कमी केला आहे. एकंदरीने बहुतेक सर्व ग्रंथ मूळचाच आहे असे म्हटले तरी चालेल. दोनच ठिकाणी मी आपल्याकडून दहा-पाच वाक्ये जास्त घातली आहेत, तीही मूळच्या ग्रंथाला अनुसरून आहेत.
या ह॒कीगतीचे वाचनापासून वाचकांस आणखी एक फायदा होण्यासारखा आहे. १८५७ सालच्या बंडास आज ५० वर्षे पुरी झाली; त्या वेळच्या सामाजिक व धार्मिक स्थितींत आज किती फरक पडला आहे, आमचा शारीरिक, मानासक व नैतिक स्थिति सुधारली आहे किंवा वाईट झाली आहे, यांचीही कल्पना करण्यास या ग्रंथापासुन बरेंच साधन होईळ असें मला वाटते. सारांश, इतिहासाच्या दृष्टीने, मनोरंजनाच्या दृष्टीने व व्यवहाराच्या दृष्टीने, हा अल्प ग्रंथ वाचकांस उपयोगीं पडून प्रिय होईल, अशी आशा करून ही प्रस्तावना पुरी करितो.
मुंबई ता. १ दिसेंबर १९०७,
चिंतामण विनायक वैद्य
अनुवाद
आंखों देखा गदर : विष्णुभट्ट गोडशे वरसईकर-कृत मराठी पुस्तक "माझा प्रवास" का हिन्दी रूपांतर
अनुवादक: अमृतलाल नागर, राजपाल, 1986
अनुक्रमणिका
- गोडे घराण्याचा वृत्तांत
- प्रवास व बंडाची सुरुवात
- बंडवाल्यांची हकीकत
- झांशी येथील पूर्ववृत्तांत
- झांशी येथील उत्तरवृत्त
- काल्पी प्रकरण
- ग्वाल्हेर व मध्य हिंदुस्थान
- तीर्थयात्रा
- उपसंहार
Reviews
There are no reviews yet.