Description
निवेदन
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अशा व्यक्तींची साधारणत: शंभर ते सव्वा पानांची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्रातील शिल्पकार”या चरित्रग्रंथमालेतील “महर्षी धोंडो केशव कर्वे”हा एकोणिसावा चरित्रग्रंथ आहे.
शेतातल्या पिकाची नीट वाढ होण्यासाठी वेळीच त्यातल्या तणाचं निर्मूलन करावयास हवं. तणाचं निर्मूलन करण्याचे दोन मार्ग आहेत. तणाचा प्रतिबंधक औषधाने फवारणी करणे हा एक मार्ग व खुरपणं करून ते तण काढून टाकणे हा दुसरा मार्ग. महर्षी धोंडो केडव कर्वे यांचं कार्य दुसऱ्या प्रकारचं आहे. समाजातल्या अनिष्ट रुढी नष्ट करण्यासाठी त्यांनी विचारांचा प्रहार करण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीचा अवलंब केला. त्या काळात विधवा विवाहाचा नुसता विचार करणे हे पाप मानलं जात होतं त्या काळात त्यांनी एका विधवा स्रीशी विवाह केला.
निराधार स्रियांना आधार देणे, शिक्षणाची दारं त्यांना खुली करणे हे महर्षी कर्वे यांनी आपलं जीवित कार्य मानलं. केवळ मानलं नाही तर या कार्याला त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत स्वतःला वाहून घेतलं.
प्रस्तुत ग्रंथाचे लेखक श्री. न. म. जोशी यांनी “अनाथबालिकाश्रम ते महिला विद्यापीठ असा कर्वे यांच्या स्वप्नांचा विस्तार झाला”असं त्यांचं सार्थ शब्दात वर्णनकेलं आहे. महर्षी कर्वे यांनी समता संघ, जातिनिर्मूलन संस्था, ग्रामश्रिक्षण मंडळ इत्यादी संस्थांची कामे उभी केली असली तर त्यांची खरी ओळख स्रियांच्या संदर्भातील केलेल्या कामामुळे होते.
महर्षी कर्वे यांनी केलेल्या समाजकार्याचा विशेष असा की, त्यांनी आपल्या संसाराकडे पाठ फिरवून हे समाजकार्य केलेले नाही तर आपला संसार नीटनेटका करीत हे समाजकार्य केले.
हे समाजकार्य करण्याची महर्षी कर्वे यांची पद्धत कशी होती याचं अतिशय समर्पक वर्णन श्री. न. म. जोशी यांनी या ग्रंथात केलेलं आहे.
प्रवाहाच्याविरुद्ध पोहताना शक्य तो प्रवाहाशी जमवून घेऊन आणि प्रवाहात काही भोवरे व डोह असतील तर ते टाळून अण्णासाहेबांनी आपल्या समाजसुधारणेची नौका पैलतीराला नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला. याबाबत त्यांची स्वतःची इच्छाझक्ती, दुर्दम्य आकांक्षा, कमालीची सहनशीलता आणि शांतपणे कार्य करण्यासाठी लागणारी स्थिरबुद्धी यांचा त्यांना नेहमीच उपयोग झाला. आक्रमक नसूनही सक्रिय व सफल समाजसुधारक होता येते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
हे उदाहरण महर्षी कर्वे यांच्यापुरतचं मर्यादेत राहावे यातच त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे.
रा. रं. बोराडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
दिनांक : ४ डिसेंबर, २००३
Reviews
There are no reviews yet.