Description
प्रास्ताविक
एकोणीसशे बावन्न साली ‘बहिणाईची गाणी’ या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती निघाली आणि सार्या महाराष्ट्रात ही गाणी लोकप्रिय झाली एकोणीसशे साठ सालच्या ‘मानिनी’ या चित्रपटामुळे ‘अरे संसार
संसार’ सारखी त्यांची गाणी जनसामान्यांनाही मुखोद्गत झाली. पुढे या गाण्याला फाळके पारितोषिकही मिळाले. विविध वृत्तपत्रांतून बहिणाईचे आणि त्यांच्या कवित्वाचे कौतुक झाले. नियतकालिकांतून
त्यांच्यासंबंधी लेखही प्रसिद्धझाले. तीन डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी बहिणाईंची पंचविसावी पुण्यतिथि साजरी झाली. त्या निमित्ताने या साऱया गोष्टींची पुनश्च एकवार उजळणी झाली. परंतु प्रसंगपरत्वे
लिहिल्या गेलेल्या या साऱ्या लेखातून कौतुकाचाच भाग प्रामुख्याने आढळतो. त्यामागे एका निरक्षर,अशिक्षित, खेडवळ शेतकरी स्त्रीची निर्मिती हा एक सहानुभूतीचा दृष्टिकोण आहे. त्याचबरोबर बहिणाई या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांच्या मातोश्री म्हणून असणाऱ्या आदराचीही भावना आहे. तथापि, कौतुकाचा पहिला भर ओसरल्यानंतर जसजसे त्यांच्या काव्याच्या अंतरंगात अधिकाधिक शिरावे तसतसे त्यांच्यासंबंधी आणि त्यांच्या काव्यासबंधी अनेक प्रन उभे राहतात.
एक अडाणी खेडवळ स्री हा त्यांच्याबावतचा सर्वसाधारण दृष्टिकोण असला तरी त्यांना लाक्षणिक अर्थाने अशिक्षित म्हणता येईल का? कारण पढिकतेचा जसा सुसंस्कृतपणाशी काही संबंध नसतो, तसाच सृजनशीलतेशी ही नसतो. मग या निर्मितीमागील प्रमुख प्रवृत्ती व प्रेरणा कोणत्या? बहुतेक उपलब्ध लेखांतून वानगीदाखल त्याच त्याच कविता उद्धृत केलेल्या आढळतात. परंतु विषय आणि आशय यांची विविधता लक्षांत घेता प्रस्तुत काव्यसंग्रहातील साऱ्या रचना गुणवत्तेच्या दृष्टीने एकाच तोलाच्या आहेत असे म्हणता येणार नाही. तथापि, खास बहिणाईंचा ठसा असलेल्या कवितांचे वैशिष्ट्य काय व त्यामागील प्रयोजन कोणते असावे, या दृष्टीने शोध घेण्याचा प्रयत्नही आव्यक आहे. बहिणाईंच्या काव्य व रचनेचा आणि काव्यप्रसिद्धीचा काळ, प्राचीन-अर्वाचीन काव्य आणि लोकगीते या तीनही प्रवाहाशी कुठे ना कुठे जुळणारे या काव्याचे नाते इत्यादी गोष्टी लक्षात घेता, त्यांच्या कवितेची पृथगात्मता कशात आहे आणि तिच्या लोकप्रियतेचे मर्म कोणते ? बहिणाईंना स्वतःच्या सृजनशक्तीची जाण होती. तेव्हा ‘मन’ सारखी त्यांची कविता लक्षात घेता एखाद्या रचनेत मूळ कल्पनेचा विकास साधत साधत तिच्या उत्कर्षबिंदूप्रत पोचण्याचे रचना कौशल्य त्यांच्या ठायी होते की ते त्यांची कविता उतरवून घेणाऱ्या वा संपादित करणार्या इतर कोणाचे ? अशा प्रकारचे कितीतरी प्रश्न, उपलब्ध असलेले सारे लेख वाचूनही अनुत्तरीतच राहतात. थोडक्यात बहिणाईंच्या कवितासंबधी चिकित्सक दृष्टीने विवेचन होणे आवश्यक होते. पण तसे ते झालेले नाही असे म्हटले तर ते अप्रस्तुत ठरणार नाही.
दुसरी गोष्ट अशी की, या काव्यसंग्रहातील समग्र कवितांचा साकल्याने विचार करून त्यातून प्रकट होणाऱ्या बहिणाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्नही फारसा झालेला नाही.
त्याचप्रमाणे बहिणाईंच्या अनुभवविश्वाचे ज्या लोकसाहित्याशी नाते जुळते, त्यात काही समान प्रवृत्ती – प्रेरणा आढळतात का ? त्यांचा या तथाकथित अशिक्षित सरीवर आणि तिच्या काव्यावर कळत
नकळत कांही परिणाम आहे का ? आणि यादृष्टीने परंपरेने मुखोद्गत असलेल्या रचना आणि स्वतःची स्वतंत्र निर्मिती असा स्वच्छ फरक त्यांना करता येत होता का? इत्यादी प्रश्नांच्या संदर्भात लोकसाहित्याचा मागोवा घेऊन त्या अनुषंगाने ‘बहिणाईंच्या गाण्याची गुणवत्ता निश्चित करण्याचा प्रयत्नही झालेला दिसत नाही.
बहिणाईंविषयीच्या आणि त्यांच्या काव्याविषयीच्या उपलब्ध लेखनात अशा प्रकारच्या त्रुटी प्रकर्षाने काही समीक्षकांनाही जाणवलेल्या आहेत. उदाहरणार्थ: समाज प्रबोधन पत्रिका, मार्च-एप्रिल १९७१ या अंकातील सरिता पदकींचा लेख पहावा. बहिणाईंची कविता वाचत असतांना मनात निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांपैकी काहींची स्वरूपचिकित्सा आपल्या लेखात करून अखेरीस अशा प्रकारच्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे अभ्यासू लेखनातून मिळावीत अज्ञी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या अपेक्षेतून प्रेरणा घेऊनच बहिणाईंच्या काव्यपरिशीलनाबाबत जाणवलेल्या त्रुटी भरून काढण्याचे दृष्टीने त्यांच्या समग्र काव्याचा सर्वांगीण चिकित्सक अभ्यास करण्याचा प्रयत्न हीच प्रस्तुत लेखनामागची भूमिका आहे.
अनुक्रमणिका
काव्यसंग्रहाचा थोडक्यात परिचय.
काव्यनिर्मितीमागील प्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रयोजन ….
बहिणाईंचे वाड्मयीन व्यक्तिमत्व
जीवनविषयक तत्वज्ञान.
कर्मभक्ती अथवा देवविषयक दृष्टिकोण…
मानवतावाद अथवा मनुष्यविषयक दृष्टिकोण
संसारी स्री-बहिणाईंच्या लौकिक व्यक्तिमत्वाचे अक रूप
शेतकरी स्त्री -बहिणाईंच्या लौकिक व्यक्तिमत्वाचे दुसरे रूप…..
काव्याची बाह्यवैशिष्ट्ये रचनाबंध
काव्याची अंतर्गत झोभा.
समारोप…
Reviews
There are no reviews yet.