Description
रहस्य आणि विज्ञान साथ साथ
‘”दक्षिण अमेरिका म्हणजेच पाताळ हा माझा दृढ विश्वास आहे आणि आपल्या पुराणांप्रमाणे बळी राजा पाताळात गेला; म्हणजेच तो अगदी निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेत गेला.” या विधानावर अनेक प्रतिक्रिया होतील. कुणी काहीही म्हणोत; पण वरील विधान मी विवेकाने, गांभीर्याने व विचारपूर्वक केलेले आहे. तसेच हा मीच लावलेला शोध आहे; असे मुळीच नाही. अनेक विद्वानांपासून ते चौफेर वाचन असणार्यांना ही कल्पना नवीन नाही.’
हा उतारा आहे अनिल ज. पाटील यांच्या ‘पाताळयात्रा’ या कादंबरीच्या प्रस्तावनात्मक मनोगतातील! ज्या कादंबरीचे मनोगत इतके उत्कंठावर्धक आहे, ती कादंबरी किती उत्कंठावर्धक असेल, अशी वाचकांची मनोभूमिका होणे साहजिकच आहे आणि कादंबरी वाचत असताना शेवटपर्यंत ही मनोभूमिका अधिकाधिक पक्की होत जाते, हे विशेष. वास्तव हे कल्पितापेक्षाही अद्भुत असते या सरसकट विधानाचा यथार्थ अनुभव म्हणजेचपाताळयात्रा.
भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यांची अनोखी सरमिसळ म्हणजेच पाताळयात्रा.
दक्षिण अमेरिकेतील पेरु येथील एका नगण्य कंपनीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तीन विलक्षण बुद्धिमान भारतीय इंजिनीयर्स निघतात आणि अचानक… अचानक मती गुंग करणारा अपघात होतो. तर्काला आव्हान देणारी कलाटणी मिळते. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृती एखाद्या गुढासारखी छळत राहते. भूत, भविष्य, वर्तमानकाळाची संकल्पना विसरली जावी, अशा घटना घडत जातात.
एका अनोख्या अनुभवाचे दालन उघडून, कृष्णविवरामध्ये गतिमान होऊन स्वत:चे अस्तित्व विसरायला लावणारी ही पाताळयात्रा लेखकाच्या भूमिकेमुळे अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे.
दक्षिण अमेरिकेतील तीन शाखांच्या तालवृक्षाचे म्हणजेच त्रिशूलाचे वर्णन वाचून पाटील यांच्या मनात कथाबीज जन्माला आले, असे त्यांनी म्हटले आहे. निसर्गाकडे पाहण्याच्या त्यांच्या जिवंत दृष्टिकोनामुळे विज्ञान व प्राचीन इतिहास यावर आधारित एक आगळी, अभ्यासपूर्ण विज्ञान कादंबरी जन्माला आली. या कादंबरीतही कल्पनेच्या भरार्या जरुर आहेत, पण त्यांना सशक्त कार्यकारणभावाचे पाठबळ आहे.
वर्तमानकाळाला खर्या अर्थाने सामोरे गेले तर भूतकाळ आपोआपच समृद्ध होत जातो आणि भविष्यकाळही उज्ज्वलच घडतो. हेच जीवनाचे गमक लेखक आपल्या शब्दात मांडतो.
वामन, प्रल्हाद, त्यागराज, जिभूती, जेन मूर, रिकार्डो, प्रा. एम. मेना, बळी अशी सर्वांचीच शब्दचित्रं अत्यंत सुंदर आणि हाडामांसाची रंगविण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. कादंबरीतील पात्रांचे परस्पर नातेसंबंध आणि घटनाक्रम यातील गुंफणही मनोवेधक!
या कादंबरीच्या शेवटी पाटील यांनी जोडलेल्या परिशिष्टामुळे – संदर्भग्रंथ सूचीमुळे ‘मनोरंजन करणारी विज्ञान कादंबरी’ एवढीच या पुस्तकाची प्रतिमा न उरता त्याला एका अभ्यासू ग्रंथाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. या सूचीत आपली पुराणे आहेत, तसेच रिसर्च पेपरही आहेत, ही नोंदवण्याचीच बाब ठरते. पाटील यांची अभ्यासूवृत्ती, सत्यान्वेषक भूमिका आणि आकर्षक लेखनशैली यामुळे या कादंबरीला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. वाचकांना एक वेगळी जीवनदृष्टी, वेगळी विचारशैली देण्यात ही कादंबरी यशस्वी ठरते ती यामुळेच! तरीही ती रंजक आहे, हे विशेषच.
संतोष सावंत, लोकसत्ता ११ मे २००३
Reviews
There are no reviews yet.