Description
संपादकीय
१९७५ साली, राजर्षी शाहू महाराजांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा परिषदेने राजर्षी शाहू ग्रंथमाला मधून पाच ग्रंथ प्रकाशित केले.
त्यामध्ये ‘क्रान्तिसूक्तेः राजर्षी छत्रपती शाहू’ व A Royal Philosopher Speaks ही राजर्षी शाहूंच्या अनुक्रमे मराठी व इंग्रजी भाषणांची संपादने होती. पूर्वसूरीना वाट पुसत, अनपलब्ध भाषणं मिळवून टिपा- टिप्पणीसह ती मी संपादित केली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे त्यावेळचे अध्यक्ष श्री रा. शं. उर्फ बाळासाहेब माने यांची यामागे मुख्य प्रेरणा होती.
ह्या पुस्तकांची निकड सतत जाणवणारी राहिली.
‘क्रान्तिसृक्ते ची, मराठी / इंग्रजी एकत्रित भाषणे, संदर्भामध्ये अधिक भर, प्रदीर्घ प्रस्तावना इत्यादी स्वरूपात ही सुधारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ही जबाबदारी उचळून यथाकाल पार पाडली.
‘एतद्विषयक काम करणारे कष्टाळू पूर्वसूरी, मंडळाचे आदरणीय अध्यक्ष डॉ. फडकेसर, मंडळाचे मान्यवर सदस्य, मंडळाचे निवृत्त सचिव श्री. सूर्यकान्त देशमुख, दिवंगत सचिव कै. पंढरीनाथ पाटील, सांप्रतचे सचिव श्री. चं. रा. वडे व कार्यालयीन कर्मचारी या सर्वांचा, त्यांच्या साहाय्य व सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.
२५फेब्रुवारी, ९१ एस्. एस्. भोसले, औरंगाबाद
निवेदन
आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकोणिसाव्या शतकात महात्मा जोतीराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरुन जे झाड लावले त्याला खतपाणी घाळून काळजीपूर्वक वाढविले ते शाहू छत्रपतींनी. या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुटले शेकडो वर्षे जे ज्ञान, सत्ता, संपत्ती यापासून वचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, श्रिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा शाहू छत्रपतींनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. राजकीय स्वराज्य मिळविण्याचा प्रश्न त्यांना गौण वाटला. सामाजिक व धार्मिक समतेची प्रस्थापना करण्याच्या प्रश्नाला त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला.
विविध संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समा-समारंभात कधी अध्यक्ष म्हणून तर कधी उद्घाटक किंवा मुख्य पाहुणे म्हणून शाहू महाराजांनी जी भाषणे केली त्याचे संग्रह अनेक वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले होते. मात्र जसजसा काळ लोटतो तसतसे या भाषणांचे संदर्भ पुढील पिढ्यांना समजावून घेणे अवघड होत जाते. अशा स्थितीत कोणी ही भाषणे टिपा-टिप्पणीसह चिकित्सक वृत्तीने प्रसिद्ध केळी तर नव्या पिढीच्या वाचकांची व अभ्यासकांची सोय होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळींचे एक साक्षेपी अभ्यासक डॉ. एस्. एस्. भोसले यांनी राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांचा टिपा-टिप्पणीसह केलेला हा चिकित्सक अभ्यास वाचकांना उपयुक्त वाटेल असा विश्वास वाटतो.
य. दि. फडके
मुंबई: अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ
८ जानेवारी, १९९१
Reviews
There are no reviews yet.