भाऊ पाध्ये (Bhau Padhye)


भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे.

मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती असलेल्या शहरात संक्रमणकाळात झालेले बदल व त्याचा समाजातील सर्वच स्तरावर विशेषत: तरूण पिढीवर झालेल्या परिणामांना त्यांनी आपल्या लेखनातून अभिव्यक्ती दिली आहे.

भाऊंनी ‘वासूनाका, अग्रेसर, राडा’ या कादंबर्‍या लिहिल्या. ‘राडा’ मध्ये उच्चभ्रू कुटूंबातील तरूण, मनाविरूद्ध झालेले निर्णय सहन करू न शकल्याने वाहवत जातो. महानगरीय वातावरणात विविध सामाजिक, राजकीय प्रवाह निर्माण होत असतात व त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावर होत असतो.

अशा परिणामाच्या काही पिढ्या असतात. सत्तरच्या दशकात शिवसेनेने मुंबईत आपला प्रभाव निर्माण करायला सुरवात केली होती. कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर असलेल्या या शहरात कापड गिरण्या व गिरणी कामगार यांची वेगळीच संस्कृती निर्माण झाली होती.

बहुतांश कामगार वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपरर्‍यातून आला होता. शिवसेनेचा अजेंडा मराठी मनाला भुरळ घालणारा होता. त्यामुळे महानगरीय वातावरणात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणार्‍या मराठी तरूणांना शिवसेना हे हक्काचे व्यासपीठ मिळाले.

त्यामुळे शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. कामगार संघटनांतून कम्युनिस्टांची हकालपट्टी करून सेनेने मराठी ताकद आपल्या पाठीशी उभी केली. ‘राडा’ मध्ये ही सारी पार्श्वभूमी येते. किंबहूना या वातावरणातूनच तिची निर्मिती झाली आहे.

पाध्येंनी या बदलांमुळे होणार्‍या परिणामांचे मानसिक विश्लेषण न करता कादंबरीत संवादात्मक व पटकथात्मक, सरळ मांडणी करून विश्लेषण व निर्णयाचे स्वातंत्र्य वाचकांवर सोपविले आहे. त्या काळात ही कादंहबरी वादग्रस्तही ठरली होती.

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत.

– मनोज पोलादे webdunia

भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा – दिलीप पुरुषोत्तम चित्रे

“व्यष्टीच्या कोषामधून समष्टीचे दर्शन घडवण्याचे भाऊ पाध्यांचे कलात्मक कौशल्य हाच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गाभा आहे. भाऊंच्या लेखनात निवेदक ते स्वत: आहेत आणि नाहीतही. त्यांचे प्रत्येक पात्र निवेदनात आपला रास्त हिस्सा घेते, आपली बाजू मांडते. न्यायाधीशाशिवाय चाललेले हे खटले आहेत. परस्परविरोधी, दावे करणारे आणि स्वत:ची वकिली करणारे लोक, आरोप करणारे, अपराध करणारे, साक्ष देणारे, निकाल देणारे असे अनेक निवेदकांचे स्वर भाऊंच्या लेखनात आपल्याला ऐकू येतात. मग कळते की हा एका समाजाचा गलबला आणि त्यातून येणारा मानवतेचा आवाजच आहे…

…वर्गमुक्त, वर्णमुक्त, लिंगभेदनिरपेक्ष अशी जी मानवतावादी दृष्टी भाऊंच्या लेखनात आहे ती सर्वस्वी सेक्युलर किंवा इहवादी आहे. कोणत्याही राजकीय विचारप्रणालीची ढापणे या दृष्टीला लावलेली नाहीत. कोणतीही विभाजनशील किंवा संकुचित कलात्मक विचारसरणी तिला रंगीत चष्मा चढवत नाही. वाड्मयाद्वारा जीवनाकृतीचे चित्रण करणे हा एकमेव उद्देश भाऊंच्या वाड्मयाच्या मुळाशी आहे…”

– दिलीप पुरुषोत्तम चित्रे

प्रस्तावनेतून 

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *