आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रात ज्या साहित्यिक आणि विचारवंतांनी महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व केलं त्यामध्ये कुरुंदकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी लिहिलेले उतारे, निबंध, लेख हे सोशल मीडियावर सातत्याने दिसत राहतात.
15 जुलै 1932 साली कुरुंदकरांचा जन्म परभणी जिल्ह्यातला नांदापूर (आता हिंगोली जिल्हा) येथे झाला. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं.
हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभाग
किशोरवयीन अवस्थेतच ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हैदराबाद संस्थान निजामाच्या ताब्यात होतं.
त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. त्यांना 1948 ला त्यांनी अटक देखील झाली होती. सुटकेनंतर पुन्हा ते चळवळीत उतरले. गोविंदभाई श्रॉफ यांच्यासोबतही त्यांनी काम केलं होतं. एक धडपडा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख त्या काळात बनली होती. या काळात केलेल्या कार्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात देखील झाला.
‘साहित्यिक म्हणून ओळख मिळाली’
कुरुंदकरांचे मामा नांदापूरकर हे प्राध्यापक होते. आपल्या भाचाच्या जिज्ञासू वृत्तीची त्यांना जाण होती. त्यामुळे कुरुंदकर अगदी 10-12 वर्षांचे असले तरी त्यांचे मामा त्यांच्याशी इतिहास, पुराणं, तत्त्वज्ञान, साहित्य याची चर्चा करत.
साधारणतः अकराव्या वर्षापासून कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. 11 व्या वर्षी त्यांनी कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल. पण आली नाही. तेव्हापासून ते नियमित लिहून नियतकालिकांना आपले लेख साहित्य पाठवू लागले. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला.
पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना 10-11 वर्षं लागली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही. पण ते महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय तेव्हा बनले जेव्हा 1956 ला बा. सी. मर्ढेकर यांच्यावर लिहिलेल्या समीक्षणाची लेखमाला ‘सत्यकथा’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. त्यांनंतर मुंबईच्या मराठी साहित्य संघाने त्यांना सौंदर्यशास्त्रावर व्याख्यानासाठी बोलवलं होतं.
गमतीचा भाग म्हणजे कुरुंदकर तेव्हा इंटर (आताचं बारावी) पास नव्हते तेव्हा त्यांची पुस्तकं बीएला अभ्यासक्रमाला होती. ते मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, ते बीए पास नव्हते त्याआधी ते मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर होते, एम. ए. पास झाले नव्हते त्याआधी त्यांचा रिचर्ड्सची कलामीमांसा हा संशोधनावर आधारित असलेला ग्रंथ आला होता. त्यावेळी ते नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेत प्राथमिक शिक्षक होते.
‘प्राथमिक शिक्षकाने जेव्हा प्राध्यापकाची मुलाखत घेतली’
प्राचार्य राम शेवाळकरांनी काही काळ नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू कुरुंदकरांनी घेतला होता. जेव्हा शेवाळकरांना कळलं की, आपला इंटरव्ह्यू एक शालेय शिक्षक घेणार आहे तेव्हा ते नाराज झाले. त्यांनी कॉलेजचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे तक्रार केली. त्यावर रामानंद तीर्थ म्हणाले, यात कमीपणा काय यात तुमचा सन्मानच आहे.
इंटरव्यू सुरू झाला, कुरुंदकरांनी शेवाळकरांचा इंटरव्यू घेतला. हा इंटरव्यू सुमारे दोन तास चालला. इंटरव्यूनंतर कुरंदकरांनी त्यांची निवड केली आणि पुढे त्यांची चांगली मैत्री देखील झाली. जेव्हा शेवाळकर वणीला (विदर्भातलं) प्राचार्य म्हणून जाऊ लागले तेव्हा कुरुंदकर आणि इतर विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर निरोप द्यायला गेले. वय जास्त असूनही शेवाळकर कुरुंदकरांच्या पाया पडले त्यावर कुरुंदकर म्हणाले, “मला जास्त भावनाप्रधान होता येत नाही.” गावं बदलली तरी त्यांची मैत्री कायम राहिली.
तरुणांना चळवळीसाठी प्रोत्साहन
एम. ए. पूर्ण केल्यानंतर 1963 मध्ये ते पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांचा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी आजारी पडली तर तिच्या उशाशी बसून त्यांची ते काळजी घेत असत.
त्यातूनच ते ठिकठिकाणी व्याख्यान देऊन लोकांना वेगवेगळे विषय समजावून सांगू लागले. कुरुंदकर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. या माध्यमातून त्यांनी जागोजागी तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं. ते स्वतः देखील एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच वागत असत. सेवादल आणि इतर सामाजिक कार्याच्या निमित्तानेच त्यांची आणि हमीद दलवाईंची मैत्री घट्ट झाली.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते काम करत. साहित्यिक किंवा राजकीय चळवळीसाठी ते प्रोत्साहन देत. विचारधारा कोणतीही असली तरी त्यासाठी अभ्यासाची बैठक पक्की करून चळवळीत उतरा असं ते विद्यार्थ्यांना सांगत. त्यांच्या परिसंवादावेळी ते शांतपणे त्यांचे मुद्दे ऐकून घेत आणि नंतर त्यावर आपलं मत मांडत. त्यांना सूचना देत असत.
आणीबाणी विरोधात भाषणं
आणीबाणीच्या काळात त्यांनी इसापनीती हा विषय घेऊन व्याख्यानं दिली आणि लोकांना लोकशाहीचं महत्त्व या गोष्टींच्या आधारे पटवून देऊ लागले. ते आणीबाणीविरोधी होते पण त्यांना अटक झाली नव्हती. 2 ऑक्टोबर 1975 ला त्यांनी गांधींजींवर एक व्याख्यान दिलं होतं. त्यावेळी त्यांना पोलिसांनी आधी सांगितलं होतं की, ही सभा बेकायदा आहे जर तुम्ही बोललात तर तुम्हाला अटक होऊ शकते.
हे समजूनदेखील त्यांनी सभा घेतली. त्यांना अटक झाली नाही. ज्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारणासोबत संबंध आहे त्यांनाच अटक झाली होती, दुर्गाबाई भागवत सोडल्या तर शासनाने कुणा साहित्यिकाला अटक केली नव्हती. त्याही काळात कुरुंदकरांनी अभ्यास शिबिरे चालवली होती. ‘अपक्ष व्यासपीठ’ या नावाने ते कार्यक्रम आयोजित करत असत. यामध्ये शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमाचा उपहास ते करत असत.
‘मृत्यू पण मृत्यूलाच रडवणारा’
1977 मध्ये ते पीपल्स कॉलेजचे प्राचार्य झाले. पुढे त्यांना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला. ते त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना 10 फेब्रुवारी 1982 ला त्यांना स्टेजवरच हार्ट-अॅटॅक आला. ऐन पन्नाशीत कुरुंदकर गेले याचा धक्का मराठवाड्यालाच नाही तर पूर्ण राज्याला बसला. नांदेड येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडो लोक जमा झाले.
याबाबत अनंत भालेराव यांनी, मृत्यू पण मृत्यूलाच रडवणारा या अग्रलेखात असं लिहिलं आहे, “कुरुंदकरांचे प्राणोत्क्रमण झाले, त्या क्षणापासून त्यांचे पार्थिव गोदावरीच्या काठावर अग्नीच्या स्वाधीन होईपर्यंत अक्षरशः शेकडो अबालवृद्ध स्त्री पुरुषांना ढसाढसा रडताना, हंबरडे फोडताना, मूर्च्छित होताना, एकमेकांच्या अंगावर कोसळताना बघितले आणि काळजाने ठावच सोडला. कुरुंदकरांचा मृत्यू आकस्मिक होता, करूण होता, दुःखद होता वगैरे शब्दांच्या संहती वर्णनाला अपुऱ्या आहेत. ही घटनाच इतकी करूण आणि वेदनेने चिंब झालेली होती, की कुरुंदकरांचे जीवन हिरावून नेणाऱ्या मृत्यूलाही या विलक्षण मृत्यूने नक्कीच रडवले असणार.”
कुरुंदकरांच्या विचारांची प्रासंगिकता
नरहर कुरुंदकरांच्या निधनाला 35 वर्षं झाली आहेत. आज त्यांच्या विचारांची चर्चा होताना दिसते. त्यांचं साहित्य हे आता इंग्रजीत अनुवादित होऊन येत आहे. त्यामुळे कुरुंदकरांचे विचार प्रासंगिक आहेत हे विधान अतिशयोक्ती ठरत नाही. कुरुंदकरांच्या विचारांबरोबरच त्यांची विचारपद्धती देखील कालसुसंगत आहे.
नरहर कुरुंदकरांच्या अभ्यासाची आणि विश्लेषणाची पद्धत ही आंतरविद्याशाखीय होती. ते स्वतःला मार्क्सवादी म्हणत पण वेळप्रसंगी कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाचीही चिकित्सा ते करत. ते म्हणत “कार्ल मार्क्सने जी पद्धत दाखवली आहे तिचा मी स्वीकार केला आहे, पण तो जे बोलला ते सर्वच मी स्वीकारलेलं नाही. त्याचा शब्द मी प्रमाण मानणार नाही. ज्यांना ते काम करायचं आहे त्यांनी ते जरूर करावं.”
तर्कसंगत विचार आणि प्रमाणबद्ध मांडणीच्या जोरावर ते आपला विषय पटवून देत. संगीत, साहित्य, कला, धर्म, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा परस्पर संबंध समजून घेऊन त्यावर ते भाष्य करत. तत्कालीन प्रश्नांची उत्तरंच नाही तर त्या समस्येचं मूळ काय आहे याबद्दल ते थेट बोलत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आजही हा प्रश्न चर्चिला जातो की, डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं होतं ते योग्य होतं की अयोग्य. काही जण अशी भूमिका घेतात की विचारांचा प्रतिवाद हा विचारानेच करावा एखादं पुस्तक जाळल्यामुळे प्रश्न मिटणार नाहीत. कुरुंदकरांना डॉ. आंबेडकरांची भूमिका पूर्णपणे मान्य होती. मनुस्मृतीला जाळून डॉ. आंबेडकरांनी केवळ मनुलाच नाही तर आजच्याही आधुनिक मनुवाद्यांना आव्हानच दिलं आहे असं ते म्हणत.
‘संविधानावर माझी श्रद्धा आहे’
कोणताही प्रश्न संविधानाच्या चौकटीत सोडवावा अशी त्यांची भूमिका होती. आजच्या काळातील प्रश्न सोडवण्यासाठी संविधान हाच आधार असला पाहिजे असं त्यांचं मत होतं.“समान नागरिकत्वावर आधारलेली जातीधर्मातीत लोकशाही, तिच्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक व मानसिक आधुनिकीकरण आणि समाजवाद या बाबी माझ्या श्रद्धेचे विषय आहेत,” आणि “मी अधार्मिक असलो तरी माझी संविधानावर श्रद्धा आहे,” असेही ते म्हणत. कोणत्याही नेत्याची अथवा व्यक्तीची चिकित्सा करण्याचा अधिकार अभ्यासकाला पाहिजे असे ते म्हणत.
“माझं विवेचन सर्वांना मान्य व्हावं असा माझा आग्रह नाही. पण मला माझे विवेचन करण्याइतका निर्भयपणा वाटावा एवढे वातावरण अपेक्षिण्याचा माझा हक्क आहे. नेत्याची जात कोणती, यावर आदर बाळगणाऱ्यांची जात ठरते आणि लिहिणाऱ्याची जात कोणती यावर टाळ्यांचा अगर जोड्यांचा कार्यक्रम ठरतो, हा प्रकार चालू असेपर्यंत चिकित्सेला फारसे भवितव्य नाही,” असं कुरुंदकर म्हणत. आपल्याला असलेले प्रश्न संविधानाच्याच चौकटीत सोडावावेत असा त्यांचा आग्रह होता. ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच लागू होते.